ब्रम्हपूरी – ब्रम्हपूरी तांब्याच्या पट्ट्या चोरी प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चौगाण परिसरातील दोन डीपीमधून तांब्याच्या पट्ट्या (बसबार) चोरीला गेल्या. पहिली घटना ८ ऑक्टोबर रोजी बाजार चौकातील डीपीत उघडकीस आली. दुसरी घटना १७ ऑक्टोबर रोजी कृषीपंप वाहिनीच्या डीपीत समोर आली. पोलिसांनी सांगितल्यानुसार, महावितरणचे अंदाजे १२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे परिसरात वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याचे सांगितले जाते. किन्ही शाखेचे कनिष्ठ अभियंता मयुर गोहणे यांच्या तक्रारीवरून विद्युत अधिनियम, २००३ च्या कलम १३६ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस हवालदार मिलिंद नैताम तपास करीत आहेत.
ब्रम्हपूरी तांब्याच्या पट्ट्या चोरीच्या दोन घटना
ब्रम्हपूरी तालुक्यातील चौगाण परिसरात वीज वितरण यंत्रणेला लक्ष्य करत ट्रान्सफॉर्मरमधील (डीपी) तांब्याच्या मौल्यवान पट्ट्या (बसबार) चोरून नेणारी टोळी सक्रिय झाल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे महावितरणचे मोठे आर्थिक नुकसान होण्यासोबतच वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या प्रकरणी महावितरणच्या किन्ही शाखेतील कनिष्ठ अभियंत्यांच्या तक्रारीवरून ब्रम्हपूरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (नागभीड तालुक्यातील १६ वर्षीय मुलगी बेपत्ता, वाचा बातमी)
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, महावितरणच्या किन्ही शाख अंतर्गत येणाऱ्या चौगाण गावात ऑक्टोबर महिन्यात वीज वितरण यंत्रणेतून तांब्याच्या पट्ट्या चोरीला जाण्याच्या सलग दोन घटना उघडकीस आल्या आहेत. पहिली घटना ८ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास निदर्शनास आली, ज्यामध्ये चौगाण येथील बाजार चौकातील गावठाण डीपीच्या डिस्ट्रीब्यूशन बॉक्समधून अज्ञात चोरट्याने तांब्याच्या पट्ट्या लांबवल्या होत्या. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच, म्हणजेच १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास गावातील कृषीपंप वाहिनीच्या भुते डीपीमधील तांब्याच्या पट्ट्याही चोरट्याने लंपास केल्याचे स्पष्ट झाले.
वारंवार घडणाऱ्या या चोरीच्या प्रकारांमुळे महावितरण विभागाचे अंदाजे १२ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून, यामुळे परिसरातील विद्युत यंत्रणेच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वीज यंत्रणेतील तांब्याचे बसबार चोरीला गेल्यामुळे संबंधित भागातील वीज पुरवठा वारंवार खंडित होऊन ग्रामस्थ व शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. याप्रकरणी महावितरणच्या किन्ही शाखेचे कनिष्ठ अभियंता मयुर राजू गोहणे यांनी ब्रम्हपूरी पोलीस ठाण्यात उपस्थित राहून तोंडी तक्रार नोंदवली.
कनिष्ठ अभियंत्यांच्या तक्रारीवरून ब्रम्हपूरी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय विद्युत अधिनियम (सुधारणा) २००३ च्या कलम १३६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मिलिंद नैताम या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, परिसर आणि संशयित व्यक्तींवर नजर ठेवून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






