बल्लारपूर चाकू हल्ला प्रकरणी तपास करणारे बल्लारपूर पोलीस ठाण्याचे पथक

बल्लारपूरच्या शांतिनगरात युवकावर चाकू हल्ला; ३ आरोपींना अटक, एक फरार

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 4, 2026

बल्लारपूर: (बल्लारपूर चाकू हल्ला) शहरातील शांतिनगर परिसरात आज दुपारी एका २० वर्षीय युवकावर चाकूने जीवघेणा हल्ला झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रेमसंबंधाच्या संशयावरून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. (घरात सुरु होता कत्तलखाना, रामनगर पोलिसांची धाड, वाचा हि बातमी)

बल्लारपूर चाकू हल्ला: शांतिनगरमध्ये दुपारी काय घडले?

रोशन रंजन भोंड (वय २० वर्षे, रा. शांतिनगर, ग्रामीण रुग्णालयामागे, बल्लारपूर) असे जखमी युवकाचे नाव असून त्याच्या पोटावर चाकूने खोल वार करण्यात आले. ही घटना आज दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास घडली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रेमप्रकरणाच्या संशयावरून आरोपीने दोन दिवसांपूर्वी रोशनला समजविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र रोशनने त्याचे ऐकले नाही. याच रागातून आज दोन ते तीन जणांनी मिळून रोशनवर धारदार चाकूने प्राणघातक हल्ला चढवला.

हल्ल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत रोशनला तातडीने ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर येथे दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे हलविण्यात आले. तेथूनही त्याला अधिक उपचारासाठी तातडीने नागपूर येथे पाठविण्यात आल्याची माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि तपासाची चक्रे वेगाने फिरवली. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ३ आरोपींना बेड्या ठोकल्या असून एक आरोपी सध्या फरार आहे. फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात काही काळ तीव्र तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांच्या जलद कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात आली आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment