बाबुपेठ चाकू हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल झालेले चंद्रपूर शहर पोलीस ठाणे

बाबुपेठमध्ये बाप-लेकावर चाकू हल्ला; चंद्रपुरात गुन्हा दाखल

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 26, 2026

चंद्रपूर : बाबुपेठ चाकू हल्ला प्रकरणी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात रवींद्र नारायण मांढरे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डहाक्याच्या कार्यक्रमात सोबत न नेल्याच्या रागातून शेजाऱ्याने बाप-लेकावर चाकूने वार केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या हल्ल्यात नितीन मांढरे गंभीर जखमी झाले, तर वडील रामभाऊ मांढरे यांच्या हाताला दुखापत झाली. ही घटना २५ नोव्हेंबर रोजी रात्री घडली. (एसटी चालकावर हल्ला, वाचा बातमी)

डहाक्याच्या कार्यक्रमात सोबत न नेल्याचा राग मनात धरून शेजाऱ्यानेच बाप-लेकावर चाकूने हल्ला केल्याची खळबळजनक घटना चंद्रपूर शहरातील बाबुपेठ परिसरात उघडकीस आली आहे. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला असून, वाद सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या वडिलांच्या हातालाही चाकूचा वार लागला आहे. या प्रकरणी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाबुपेठ चाकू हल्ला कसा झाला?

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सखोल माहितीनुसार, फिर्यादी रामभाऊ किसन मांढरे (वय ६८, रा. ढिवर मोहल्ला, बाबुपेठ वॉर्ड, चंद्रपूर) हे पीएनबी बँकेतून चपराशी पदावरून सेवानिवृत्त झाले असून कुटुंबासह राहतात. त्यांचा मुलगा नितीन रामभाऊ मांढरे हा घरगुती डहाक्याचे (भजन) कार्यक्रम करण्याचे काम करतो आणि शेजारच्या काही मित्रांसह तसेच शेजारीच राहणाऱ्या रवींद्र उर्फ अन्नू नारायण मांढरे याच्यासोबत कार्यक्रमांना जात असे. मात्र, काही दिवसांपूर्वी रवींद्र उर्फ अन्नू मांढरे हा मद्यप्राशन करून डहाक्याच्या कार्यक्रमात गैरवर्तन करत असल्याने नितीनने त्याला कार्यक्रमात येण्यास नकार दिला होता. तेव्हापासून तो कार्यक्रमांना सोबत जात नव्हता.

बुधवारी, २५ नोव्हेंबर २०२६ रोजी नितीन मांढरे हा विठ्ठल मंदिर वॉर्ड येथील देविदास कार्लेकर यांच्याकडे डहाक्याच्या कार्यक्रमासाठी सायंकाळी ४ वाजता गेला आणि कार्यक्रम आटोपून रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घरी परतला. त्यानंतर त्याच दिवशी रात्री सुमारे ९.४५ वाजता रामभाऊ मांढरे आणि नितीन घरी बसलेले असताना, शेजारी राहणारा रवींद्र उर्फ अन्नू नारायण मांढरे हा घराबाहेर आला. त्याने बाहेरूनच आरडाओरड करत, तुम्ही मला सोबत नेऊ नका, एकटेच किती डहाक्याचे पैसे कमवता ते कमवा, असे म्हणत शिवीगाळ सुरू केली.

डहाक्याच्या कार्यक्रमावरून वाद, नंतर वार, बाबुपेठ चाकू हल्ला

हा आवाज ऐकून रामभाऊ मांढरे आणि त्यांचा मुलगा नितीन बाहेर आले. नितीनने त्याला, तू मद्यप्राशन केले असून कशाला शिवीगाळ करतोस, आपण उद्या या विषयावर बोलू, असे समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतापाच्या भरात रवींद्र उर्फ अन्नू मांढरे याने हातातील चाकूने नितीनच्या उजव्या आणि डाव्या बाजूच्या कुशीवर वार करून त्याला गंभीर जखमी केले. हा वाद सोडवण्यासाठी मध्ये पडलेले वडील रामभाऊ मांढरे यांच्याही उजव्या हाताच्या दोन बोटांच्या मधोमध चाकू लागून ते जखमी झाले. नितीन गंभीर जखमी झाल्याने त्याची पत्नी सौ. योगिता नितीन मांढरे आणि भाचा आकाश देविदास नागपुरे यांनी त्याला तातडीने उपचारासाठी चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.

चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, बाबुपेठ चाकू हल्ला

या घटनेनंतर फिर्यादी रामभाऊ मांढरे यांनी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तोंडी तक्रार नोंदवली. यावरून २६ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणात रवींद्र नारायण मांढरे (रा. ढिवर मोहल्ला, बाबुपेठ वॉर्ड, चंद्रपूर) याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ११८(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक श्याम गोविंदराव गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग दत्तराव हाके करत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

2 thoughts on “बाबुपेठमध्ये बाप-लेकावर चाकू हल्ला; चंद्रपुरात गुन्हा दाखल”

Leave a Comment