चंद्रपूर / बल्लारपूर: POCSO Victims Identity Leaked घटनेमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. बल्लारपूर येथील गुन्हेगार मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन आनंद अंदेवार याने व्हॉट्सॲप ग्रुपवर अनधिकृत प्रेसनोट फिरवून पीडित बालकांची नावे उघड केली होती. या बेकायदेशीर कृत्याची गंभीर दखल घेत बल्लारपूर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (हे हि वाचा – आश्रमशाळेतील २ अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार)
पीडित बालकांची प्रतिष्ठा व सुरक्षितता धोक्यात आणल्याचा ठपका
बल्लारपूर पोलीस ठाण्यात नुकताच लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण कायद्यान्वये (POCSO) अत्याचाराचा एक गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, ६ ऑगस्टच्या रात्री ९:३० वाजेच्या सुमारास एका व्हॉट्सॲप क्रमांकावरून (९५२७०२७३२२) पत्रकार व इतर नागरिकांच्या विविध ग्रुपवर एक प्रेसनोट फिरवण्यात आली. या प्रेसनोटमध्ये सदर गुन्ह्यातील पीडित अल्पवयीन बालकांची थेट नावे नमूद करून त्यांची ओळख सार्वजनिक करण्यात आली होती. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ शहानिशा केली आणि संबंधित मोबाईल क्रमांकाचा ‘एसडीआर’ (SDR) मिळवला. त्यावरून ही प्रेसनोट प्रसारीत करणारा व्यक्ती आंबेडकर वार्ड, बल्लारपूर येथील रहिवासी अमन आनंद अंदेवार असल्याचे निष्पन्न झाले.
बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा (POCSO) २०१२ आणि बाल न्याय (बालकाची काळजी आणि संरक्षण) कायदा २०१५ नुसार कोणत्याही पीडित बालकाची नावे, फोटो किंवा ओळख कोणत्याही प्रसारमाध्यमांवर अथवा सोशल मीडियावर जाहीर करण्यास सक्त बंदी आहे. आरोपी अमन अंदेवार हा पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याने कायद्याचे उल्लंघन करत जाणीवपूर्वक ही माहिती सोशल मीडियावर व्हायरल केली आणि पीडित बालकांची प्रतिष्ठा व सुरक्षितता धोक्यात आणली. याप्रकरणी बल्लारपूर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध कलम २३(४) पोक्सो सहकलम ७४ बाल न्याय कायद्यानुसार स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि राजुराचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत बल्लारपूरचे पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे, पोलीस उपनिरीक्षक उमेश जोगदंड, पोलीस हवालदार संतोष पंडित, तसेच अमंलदार महेश कुकूडकर, मिलिंद आत्राम, फुलचंद लोधी, शांतकुमार घोसे आणि लखन चव्हाण यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. कोणत्याही पीडित बालकाची ओळख उघड करणे हा कायदेशीर गुन्हा असून असा प्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






