चंद्रपूर: Chandrapur Illegal Sand Racket प्रकरणात रामनगर आणि भद्रावती पोलिसांनी संयुक्त कारवाई करत एक मोठा पर्दाफाश केला आहे. एकाच नोंदणी क्रमांकाचा आणि एकाच बनावट ई-टीपीचा (eTP) वापर करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवणाऱ्या टोळीला पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल ८१ लाख १० हजार रुपये किमतीची दोन वाहने आणि वाळू जप्त केली आहे. (हे हि वाचा – अल्पवयीन मुलांची ओळख जाहीर केली, मनसे जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल)
मिळालेल्या सविस्तर बातमीनुसार, ७ ऑगस्ट २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास गस्त घालत असताना रामनगर पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, मूळ ते चंद्रपूर मार्गाने दोन वाहने एकाच नंबर प्लेटचा वापर करून अवैध वाळू वाहतूक करत आहेत. या माहितीच्या आधारे रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने नागपूर मार्गावरील वाहतूक शाखेजवळ नाकाबंदी केली.
नाकाबंदीदरम्यान रात्री सुमारे ३:०० वाजताच्या सुमारास संशयास्पद वेगाने येणाऱ्या १२ चाकी हायवा ट्रकला (MH-34-BZ-8114) पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने गाडी भरधाव वेगाने नागपूरच्या दिशेने पळवली. पोलिसांनी तातडीने पाठलाग करत भद्रावती पोलिसांच्या मदतीने घोडपेठ येथे सदर गाडी पकडली. या घटनेनंतर काहीच वेळात, म्हणजेच रात्री ३:३० वाजताच्या सुमारास दुसरी १६ चाकी गाडी नाकाबंदीत थांबवण्यात आली.
एकाच नंबर प्लेटवर चालणाऱ्या दोन स्वतंत्र वाहनांमुळे पोलीसही चक्रावले
पोलिसांनी दोन्ही वाहनांची कसून पाहणी केली असता अत्यंत धक्कादायक बाब समोर आली. दोन्ही स्वतंत्र वाहनांवर एकच नोंदणी क्रमांक (MH-34-BZ-8114) लावलेला होता. तसेच दोन्ही गाड्यांमधील चालक एकाच ई-टीपी क्रमांकाचा (33198347) वापर करून बेकायदेशीरपणे रेतीची वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी पोलिसांनी १६ चाकी ट्रकाचा चालक स्वप्निल सुरेश कबडे (वय ३७ वर्ष, रा. सावजी नगर, वर्धा), १२ चाकी ट्रकाचा चालक रामकेश राजेश केवट (वय २० वर्ष, रा. जि. सीधी, मध्य प्रदेश) आणि वाहन मालक रोहित चाफले (रा. खांबाळा, ता. वरोरा, जि. चंद्रपूर) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी परस्परांशी संगनमत करून शासनाची फसवणूक करण्याच्या उद्देशाने बनावट ई-टीपी व नंबर प्लेटचा वापर केल्यामुळे त्यांच्यावर रामनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३०३(२), ३१८(४), ३३६(३), ३(५) यासह महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, खाण व खनिज अधिनियम आणि पर्यावरण कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या कारवाईत पोलिसांनी ४५ लाख रुपये किमतीचा टाटा ४८३० टी. के. १६ चाकी ट्रक, ३५ लाख रुपये किमतीचा टाटा टिप्पर ३५३२ टी. के. हायवा १२ चाकी ट्रक आणि दोन्ही गाड्यांमधील प्रत्येकी ११ ब्रास रेती (किंमत १ लाख १० हजार रुपये) असा एकूण ८१ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर धडक कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे व रामनगरच्या ठाणेदार प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात सपोनि वीरेंद्र केदारे, पो.उपनि. सर्वेश बेलसरे, पोलीस अंमलदार विनोद यादव, गणेश भोयर, जितेंद्र आकारे, अनुप आष्टांकार, गोपाळ आरकुवर, अजित शेंडे, प्रकाश मडावी आणि राजू चिताडे यांनी पार पाडली असून पुढील तपास रामनगर पोलीस करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






