चंद्रपूर: bogus doctor shegaon chandrapur या प्रकरणी पोलीस आणि आरोग्य विभागाने शेगाव बु. येथे मोठी कारवाई केली आहे. विनापरवाना क्लिनिक चालवून रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बिष्णू बिश्वासविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
आरोग्य विभागाच्या पथकाने धाड टाकली असता आरोपीने बाथरूमला जातो म्हणत चकमा देऊन पसार झाला. पोलिसांनी क्लिनिकमधील सर्व बेकायदेशीर ॲलोपॅथिक औषधी साठा आणि वैद्यकीय साहित्य जप्त केले आहे. आरोपीचा शोध सुरू आहे.
पोलिसांना चकमा देऊन आरोपी डॉक्टर फरार
जिल्ह्यात अवैध आणि बोगस वैद्यकीय व्यावसायिकांवर आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवली जात असतानाच शेगाव (बु.) येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वैद्यकीय व्यवसायाचा कोणताही अधिकृत दाखला किंवा नोंदणीकृत परवाना नसतानाही बेकायदेशीरपणे क्लिनिक चालवून रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या एका बोगस डॉक्टरावर शेगाव पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिष्णू महानंदा बिश्वास (वय ५२, रा. मठ वॉर्ड, शेगाव बु., ता. वरोरा) असे या आरोपीचे नाव असून, पोलीस आणि आरोग्य विभागाच्या पथकाने धाड टाकली असता तो चकमा देऊन घटनास्थळावरून पसार झाला आहे. (हे हि वाचा – महिला सुरक्षेत निष्काळजीपणा, चंद्रपुरात ६७ संस्थांना नोटीस)
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या निर्णयान्वये बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पुनर्विलोकन समिती गठीत करण्यात आलेली आहे. या समितीच्या निर्देशांनुसार आणि गुप्त माहितीच्या आधारे वरोरा येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रतिक सूर्यभान बोरकर यांच्या नेतृत्वात आरोग्य विभाग, महसूल प्रशासन आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने मंगळवार, ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास शेगाव येथील आरोपी बिष्णू बिश्वास याच्या घर व क्लिनिकवर छापा टाकला.
‘डॉ. बिश्वास दवाखाना’ नावाने चालवला जात होता व्यवसाय
कारवाईदरम्यान पथकाने तपासणी केली असता, घराबाहेर ‘डॉ. बिश्वास दवाखाना (BEMS)’ असा पदवीचा फलक लावण्यात आल्याचे निदर्शनास आले. पथकाने पंचांसमक्ष आरोपीच्या घराची व क्लिनिकची झाडाझडती घेतली असता तेथे मोठ्या प्रमाणावर ॲलोपॅथिक औषधी साठा, शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्जिकल साहित्य, सलाईन आणि इंजेक्शन्स आढळून आले. या साहित्याची साठवणूक आणि वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेले कोणतेही नोंदणीकृत प्रमाणपत्र किंवा परवाना आरोपी बिश्वास याच्याकडे उपलब्ध नव्हता.
पथकाकडून जप्ती पंचनाम्याची कारवाई सुरू असतानाच, आरोपी बिष्णू बिश्वास हा ‘बाथरूमला जाऊन येतो’ असे सांगून चकमा देत तेथून पळून गेला. आरोपी फरार झाल्याने पोलिसांनी घटनास्थळावरील सर्व बेकायदेशीर औषधी व वैद्यकीय साहित्य जप्त करून पंचनाम्यावर आरोपीची पत्नी सौ. पूनम बिश्वास यांची स्वाक्षरी घेतली. आरोपीने कोणत्याही अधिकृत पदवी आणि परवान्याशिवाय गावात क्लिनिक थाटून नागरिकांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
याप्रकरणी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रतिक बोरकर यांच्या तक्रारीवरून शेगाव पोलिसांनी आरोपी बिष्णू बिश्वास याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ चे कलम ३१८(४), ३१९(२) सह महाराष्ट्र वैद्यकीय अधिनियम १९६१ चे कलम ३३, ३३(अ) आणि ३६ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. ठाणे प्रभारी पोलीस निरीक्षक योगेंद्रसिंग यादव यांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून पसार झालेल्या बोगस डॉक्टराचा शोध घेतला जात आहे
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






