चंद्रपूर: Chandrapur Housebreaking Case अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. उप पोलीस स्टेशन उमरी पोतदार हद्दीतील सातारा तुकूम येथे झालेली घरफोडी उघडकीस आली आहे.
पोलीस पथकाने अवघ्या काही दिवसांत या गुन्ह्याचा यशस्वी छडा लावला. या प्रकरणात एका भंगार व्यापाऱ्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून १,३२,८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. (हे हि वाचा – शेगाव मध्ये बोगस डॉक्टरवर धाड, डॉक्टर पसार)
सातारा तुकूम येथील घरफोडीचा एलसीबीकडून जलद छडा
मिळालेल्या माहितीनुसार, ५ ऑगस्ट रोजी उप पोलीस स्टेशन उमरी पोतदार अंतर्गत येणाऱ्या सातारा तुकूम येथील वन संरक्षण समितीच्या हॉलचे कुलूप तोडून अज्ञातांनी आत प्रवेश करत चोरी केली होती. या प्रकरणी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ३०५(ई), ३३१(३) आणि ३३१(४) अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाची समांतर सूत्रे हलवून तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि तीन सराईत आरोपींना जाळ्यात ओढले.
या कारवाईत पोलिसांनी चंद्रपूर येथील नसीब स्क्रॅप मर्चंटचा संचालक शेख नाजिम शेख हाफीज (वय ३९ वर्षे), घुटकळा वॉर्ड येथील रहिवासी मोहम्मद फिरोज अब्दुल वहाब उर्फ सक्सेना (वय ४४ वर्षे) आणि सावरकर चौक परिसरातील पैयनप्पा उर्फ कुट्टी अण्णा रवी शेट्टी या तिघांना ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या आहेत.
पोलीस पथकाने आरोपींकडून वन संरक्षण समितीच्या हॉलमधून चोरीला गेलेली १० हजार रुपये किमतीची हुस्कवर्ना कंपनीची आग विझवणारी जुनी एअर मशीन, १ हजार रुपयांचे लोखंडी कुंपण तारेचे बंडल, समितीचे नाव कोरलेली ३,५०० रुपयांची ३५ स्टीलची ताटे आणि ५ हजार रुपये किमतीचे मिरची कांडप मशीनचे ५ सुटे भाग असा थेट गुन्ह्याशी संबंधित मुद्देमाल जप्त केला आहे.
याशिवाय, आरोपींच्या ताब्यातून संशयित स्वरूपातील इतरही मोठा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. यामध्ये २५,७०० रुपये किमतीची २५७ किलो वजनाची नवीन अॅल्युमिनियम इलेक्ट्रिक तार, १७,९०० रुपये किमतीचे ‘SARTHK HB 116 DEVELOPED UNDER RDSS’ असे नाव असलेले पांढऱ्या रंगाच्या इलेक्ट्रिक पोलचे ७ तुकडे, ३१,९०० रुपये किमतीचे ’13-410′ व ’13-370′ क्रमांक अंकित असलेले गंजलेले इलेक्ट्रिक पोल आणि रेल्वे विभागाच्या रुळ कापणीशी संबंधित ३७,८०० रुपये किमतीचे लोखंडी साहित्य (कड्या व पट्ट्या) असा एकूण १,३२,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींची रीतसर वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना जप्त केलेल्या मुद्देमालासह उप पोलीस स्टेशन उमरी पोतदार यांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उमरी पोतदार पोलीस करीत आहेत. स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर आणि मूळ पथकाच्या या जलद आणि धडक कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






