chandrapur voter list revision blo campaign

चंद्रपूर जिल्ह्यात मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम; ९९ टक्के काम पूर्ण

User avatar placeholder
Written by Prakash Hande

August 6, 2026

चंद्रपूर – chandrapur voter list revision मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांत विशेष सखोल पुनरीक्षण वेगाने सुरू आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही कार्यवाही केली जात आहे.

जिल्ह्यात १७ लाख ९२ हजार मतदारांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. निवडणूक आयोगाने १७ ऑगस्टपर्यंत मुदत वाढवली आहे.

जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी नागरिकांना बीएलओकडे अर्ज जमा करण्याचे आवाहन केले आहे. या प्रक्रियेमुळे त्रुटीरहित यादी तयार होईल.

डिजिटायझेशनमध्ये ९९.६९ टक्के काम यशस्वीरित्या पूर्ण

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यात ‘मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रम – 2026’ राबविण्यात येत आहे. ‘एकही पात्र मतदार वंचित राहू नये आणि एकही अपात्र मतदार यादीत राहू नये’ या मुख्य उद्दिष्टाने चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व 6 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदार याद्या अधिक अचूक, अद्ययावत व त्रुटीरहित करण्यासाठी विशेष सखोल पुनरीक्षणाची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू आहे. या अंतर्गत आतापर्यंत 17 लक्ष 92 हजार 133 मतदारांचे डिजिटायझेशन (99.69 टक्के) यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. (हे हि वाचा – महिला सुरक्षेत निष्काळजीपणा, ६७ संस्थांना नोटीस)

जिल्ह्यातील एकूण 17 लक्ष 97 हजार 655 मतदारांपैकी 5 ऑगस्ट 2026 पर्यंत 17 लक्ष 97 हजार 027 मतदारांना (99.97%) गणना प्रपत्रे (इन्युमरेशन फॉर्म) वितरित करण्यात आली आहेत. यापैकी 17 लक्ष 92 हजार 133 मतदारांचे डिजिटायझेशन (99.69 टक्के) पूर्ण झाले आहे. भारत निवडणूक आयोगाने राज्यातील विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास 17 ऑगस्ट 2026 पर्यंत मुदतवाढ देऊन सुधारित कालावधी जाहीर केला आहे.

जिल्ह्यात एकूण 2076 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) नियुक्त असून सर्वांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय कामाचा आढावा घेतला असता, 70-राजूरा, 72-बल्लारपूर, 73-ब्रम्हपूरी व 74-चिमूर या मतदारसंघांमध्ये एकूण 100 टक्के काम पूर्ण झाले असून 75-वरोरा येथे 99.81 टक्के तर 71-चंद्रपूर मतदारसंघात 98.63 टक्के काम पूर्ण झाले आहे.

असा आहे पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम : 

1) मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांमार्फत (बीएलओ) घरोघरी भेटी 30 जून ते 17 ऑगस्ट 2026 पर्यंत, 2) मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण / पुनर्रचना 17 ऑगस्ट, 3) प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी 24 ऑगस्ट 2026, 4) दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी 24 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर 2026 पर्यंत, 5) नोटीस टप्पा/दावे व हरकती निकालात काढणे 24 ऑगस्ट ते 22 ऑक्टोबर 2026, 6) अंतिम मतदार याद्यांची प्रसिध्दी 27 ऑक्टोबर 2026

नागरिकांना व राजकीय पक्षांना आवाहन : 1) सध्या सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन पडताळणी करत आहेत. ज्या मतदारांनी अद्याप आपले गणना प्रपत्र (इन्युमरेशन फॉर्म) अचूक भरून जमा केले नाही, त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित बीएलओ कडे 17 ऑगस्ट, 2026 पर्यंत ते जमा करावे. 2) जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे बूथस्तरीय प्रतिनिधी (बीएलए) यांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा. 3) लोकशाही बळकटीकरणासाठी आणि त्रुटीरहित मतदार यादी तयार करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात निवडणूक प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment