Chandrapur Human Trafficking प्रकरणातील पोलिस कारवाईची प्रतीकात्मक प्रतिमा

Human Trafficking । दोन मुलांची विक्री, नवजात बाळाचाही सौदा, ३ महिला अटकेत

User avatar placeholder
Written by Prakash Hande

May 30, 2026

Human Trafficking : चंद्रपूर : पैशांच्या हव्यासापोटी पोटच्या गोळ्यांचा सौदा करणाऱ्या एका कसाई मातेचा माणुसकीला काळीमा फासणारा कारनामा चंद्रपुरात उघडकीस आला आहे. स्वतःच्या दोन निष्पाप मुलांची अवघ्या चार लाखांत विक्री केल्यानंतर, या निर्दयी महिलेने आपल्याच १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या नवजात बाळाचीही विक्री करण्याचा घाट घातला होता. मात्र, रामनगर पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा भयानक डाव उधळला गेला असून, या आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीच्या मोठ्या रॅकेटचे ‘बिंग’ फुटले आहे. (पैश्यासाठी पोटच्या गोळ्याची विक्री)

या प्रकरणातील आरोपी आईसह, बाळ खरेदी करणाऱ्या दोन महिला अशा एकूण तीन महिलांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आज, शनिवारी या तिघींना न्यायालयाने हजर केले असता, न्यायालयाने पोटच्या मुलांचा सौदा करणाऱ्या कसाई मातेला १ जूनपर्यंत पोलीस कोठडी (PCR) सुनावली आहे, तर बाळ खरेदी करणाऱ्या दोन्ही महिलांची न्यायालयीन कोठडीत (MCR) रवानगी केली आहे. तसेच विक्री केलेल्या अडीच वर्षे आणि ८ महिन्यांच्या दोन्ही बालकांना सुरक्षितपणे अनाथाश्रमात पाठवण्यात आले आहे.

Human Trafficking प्रकरणात तपासाला वेग

या संपूर्ण प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि नराधम प्रियकर अजय फुलझेले हा सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. या चौघांवरही ‘अँटी Human Trafficking’ (मानवी तस्करी) व ‘पॉक्सो’ अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर तिची ओळख अजय फुलझेले याच्याशी झाली आणि दोघेही आपल्या १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीसह लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. मात्र, काही दिवसांतच नराधम अजयची नजर त्या अल्पवयीन मुलीवर पडली आणि त्याने तिच्यावर अत्याचार केला.

दरम्यान ती मुलगी गरोदर राहिल्याचे समजताच चंद्रपुरात वाच्यता होईल या भीतीने अजय आणि तिच्या निर्दयी आईने तिला प्रसूतीसाठी नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. तिथे रुग्णालय प्रशासनाला संशय येऊ नये म्हणून “पूर परिस्थितीमध्ये आमची सर्व कागदपत्रे वाहून गेली” अशी खोटी कथा रचली आणि मुलीचे वय २० वर्षे असल्याचे खोटे सांगितले. परंतु वैद्यकीय तपासणीदरम्यान डॉक्टरांना मुलीच्या वयावर संशय आल्यामुळे त्यांनी तातडीने नागपूरच्या अजनी पोलिसांकडे ‘एमएनसी’ (MNC) पाठवली. अजनी पोलिसांनी तात्काळ ‘झिरो एफआयआर’ नोंदवत हे संवेदनशील प्रकरण पुढील तपासासाठी चंद्रपूर पोलिसाकडे वर्ग केले.

तपासाची सूत्रे रामनगर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) अश्विनी वाकडे यांच्याकडे येताच त्यांनी पीडित अल्पवयीन मुलीचे सविस्तर बयान घेतले. यावेळी त्यांना हे प्रकरण केवळ अत्याचाराचे नसून यामागे काहीतरी मोठे रॅकेट असल्याचा संशय आला. त्यांनी पीडित मुलीच्या आईला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली, ज्याने पोलिसांचेही डोके चक्रावून गेले. या कसाई मातेने यापूर्वी स्वतःचीच दोन मुले तेलंगणा आणि स्थानिक पातळीवर प्रत्येकी दोन लाख रुपयांना (एकूण ४ लाख) विकली होती.

इतकेच नव्हे तर आपल्या अल्पवयीन मुलीच्या पोटी जन्माला आलेल्या या नवजात बाळाचीही ती अशाच प्रकारे लाखो रुपयांमध्ये विक्री करणार होती. पोलिसांनी Human Trafficking चे कलम जोडून तपास चक्र गतीने फिरवले आणि बाळाची खरेदी करणाऱ्या एका महिलेला थेट तेलंगणा राज्यातील कागजनगर येथून तर दुसऱ्या महिलेला चंद्रपूर येथून अटक केली. पोलिसांनी या रॅकेटमधून अडीच वर्ष आणि ८ महिन्यांच्या बालकांची सुटका करून त्यांची रवानगी शहरातील अनाथाश्रमात केली आहे. या धडक कारवाईनंतर आज तीनही महिला आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते. सध्या रामनगर पोलीस फरार मुख्य आरोपी अजय फुलझेले याचा कसून शोध घेत असून या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment