Rajura Murder Case प्रकरणातील पोलिस तपासाची प्रतीकात्मक प्रतिमा

Murder Case । ब्लॉक-अनब्लॉकच्या वादातून रक्तरंजित शेवट, हत्याकांडाचा उलगडा

User avatar placeholder
Written by Prakash Hande

May 30, 2026

Murder Case : चंद्रपूर : राजुरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या धोपटाला टाउनशिपमध्ये घडलेल्या विवाहितेच्या निर्घृण हत्याकांडाचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवघ्या काही तासांत छडा लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी थेट तेलंगणा राज्यातील मंचेरियाल येथून मुख्य आरोपी राजेश व्यंकट अटल्ला (वय ३१) याला बेड्या ठोकल्या आहेत. सोशल मीडियावरील ब्लॉक-अनब्लॉकचा खेळ, प्रेमप्रस्ताव आणि मनातील जुना संताप यातूनच हे थरारक हत्याकांड घडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. (विवाहितेची गळा चिरून हत्या)

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर येथील महाकाली कॉलनी, कपिल चौक येथील रहिवासी असलेली शीतल रणधीर कुंभारे (वय ३६) ही महिला उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवण्यासाठी आपल्या मुलीसह धोपटाला येथील वेकोली कॉलनीतील क्वार्टर क्रमांक ५५/२ मध्ये राहणाऱ्या आपल्या माहेरी (आईकडे) आली होती. २९ मे २०२६ च्या मध्यरात्री ते ३० मेच्या सकाळ दरम्यान अज्ञात इसमाने घरात घुसून शीतलची गळा चिरून अत्यंत निर्घृण हत्या केली होती. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती.

Rajura Murder Case मध्ये पोलिसांचा मोठा खुलासा

स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरवली असता, मृत शीतलच्या हत्या तिच्या प्रियकराने केल्याचे उघड झाले. आरोपी प्रियकराचे नाव ३१ वर्षीय राजेश अटल्ला राहणार मंचेरियल आहे. मृत शीतल आणि आरोपी राजेश हे एकमेकांना लहानपणापासून ओळखत असल्याचे समोर आले. शीतलच्या आईची आई म्हणजेच तिची आजी तेलंगणातील मंचेरियाल येथे राहत असल्याने तिथलाच रहिवासी असलेल्या राजेशसोबत तिची जुनी ओळख होती. दोघेही वर्गात सोबत एकत्र शिकले यादरम्यान राजेश ने शीतल पुढे प्रेमाचा प्रस्ताव दिला, तिने होकारही दिला. दोघांचेही वेगवेगळे लग्न झाल्यानंतरही राजेश शीतलच्या संपर्कात होता. या काळात शीतलने राजेशकडून अनेकदा पैसेही घेतले होते. मात्र, छोट्या-छोट्या कारणांवरून होणाऱ्या वादांमुळे शीतलने २०२४ मध्ये राजेशला सोशल मीडियावर ब्लॉक केले होते.

महिनाभरापूर्वीच शीतलने राजेशला अनब्लॉक केले. राजेश तिला सतत मेसेज करायचा, मात्र ती त्याला कोणताही रिप्लाय देत नव्हती. विशेष म्हणजे शीतल रात्री उशिरापर्यंत ऑनलाईन असायची, पण राजेशच्या मेसेजला उत्तर न देता ती दुर्लक्ष करायची, ज्यामुळे राजेशच्या मनात संशयाची पाल चुकचुकली आणि तीव्र संताप निर्माण झाला. काही दिवसांपूर्वीच त्यांच्यात पुन्हा थोडे बोलणे सुरू झाले होते. घटनेच्या दिवशी शीतलचे भाऊ आणि आई बाहेरगावी गेले असल्याने तिने राजेशला भेटण्यासाठी घरी बोलावले. मात्र, आधीच मनात सूडाची भावना आणि इतक्या वर्षांचा राग धरून बसलेला राजेश शीतलचा काटा काढण्याच्या हेतूनेच चंद्रपुरात आला. रात्रीच्या अंधारात त्याने शीतलचा गळा चिरून तिची हत्या केली आणि कोणालाही संशय येऊ नये म्हणून अत्यंत चलाखीने रात्रीच बस पकडून आपल्या गावी तेलंगणात पसार झाला. अशी कबुली आरोपी राजेश ने दिली.

सुरुवातीला या गुन्ह्यात पोलिसांना कोणताही सुगावा नव्हता, मात्र याप्रकरणी गुन्हे शाखेची एंट्री झाल्यावर LCBचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनात पथकाने तांत्रिक आणि सायबर तपास करत आरोपी राजेशचे लोकेशन शोधून काढले आणि मंचेरियाल येथे जाऊन त्याच्या मुसक्या आवळल्या. राजेशच्या या कृत्याने २ कुटुंब मात्र उध्वस्त झाले.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात LCB पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोउपनि सुनील गौरकार, सुभाष गोहोकर, किशोर वैरागडे, अजय बागेसर, सतीश अवथरे, इम्रान खान, संतोष येलपूलवार, गणेश मोहुर्ले, हिरालाल गुप्ता, शेखर माथनकर, गोपीनाथ नरोटे, शशांक बदामवार, किशोर वाकाटे, वृषभ बारसिंगे व गजानन मडावी यासह सायबर सेलचे कार्तिक खनके, गुणवंत आणिअनिमेश यांनी केली.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment