Rajura Murder Case : राजुरा (चंद्रपूर) : वेकोलिच्या धोपटाळा कामगार वसाहतीत एका विवाहित महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याची थरारक घटना उघडकीस आली आहे. शीतल रणधीर कुंभारे (वय ३५) असे मृत महिलेचे नाव असून, या भीषण हत्याकांडामुळे संपूर्ण राजुरा तालुक्यासह चंद्रपूर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. शीतल या मूळच्या चंद्रपूर येथील महाकाली कॉलरी, कपिल चौक येथील रहिवासी असून, त्या काही दिवसांपूर्वी उन्हाळ्याच्या सुट्या घालवण्यासाठी धोपटाळा टाऊनशिपमधील क्वॉर्टर क्रमांक ५२/२ येथे आपल्या माहेरी आल्या होत्या. (तळोधी मध्ये धाडसी घरफोडी)
Rajura Murder Case मुळे धोपटाळा परिसर हादरला
प्राप्त माहितीनुसार, ही धक्कादायक घटना २८ मे २०२६ च्या मध्यरात्री ते २९ मे २०२६ च्या सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. घटनेच्या वेळी घरात शीतल आणि त्यांची १२ वर्षांची मुलगी निरीक्षा या दोघीच होत्या. शीतल यांचे भाऊ आणि आई देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले असल्याने घराचा फायदा घेत अज्ञात आरोपीने मध्यरात्री घरात प्रवेश केला. मुलगी दुसऱ्या खोलीत गाढ झोपेत असताना, अज्ञात नराधमाने शीतल यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. अत्यंत क्रूरपणे त्यांचा गळा चिरून त्यांची हत्या करण्यात आली आणि आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. जाताना आरोपीने मृत महिलेचा ‘पोको’ (POCO) कंपनीचा मोबाईल फोनही सोबत नेल्याचे समोर आले आहे.
शुक्रवारी, २९ मे रोजी सकाळी मुलगी झोपेतून उठल्यानंतर तिला आई कुठेच दिसून आली नाही. तिने तातडीने शेजाऱ्यांना याबद्दल माहिती दिली. शेजाऱ्यांच्या मदतीने घरात शोध घेतला असता, एका खोलीत शीतल कुंभारे या रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत आढळून आल्या. हा थरार पाहून संपूर्ण परिसरात एकच भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसिफराजा बी. शेख यांनी आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. मृत महिलेचे पती रणधीर राजू कुंभारे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे राजुरा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) आणि ३३२(अ) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, चंद्रपूर जिल्हा पोलीस प्रशासनाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. या संवेदनशील आणि गंभीर प्रकरणाचा तपास आता स्थानिक गुन्हे शाखेकडे (LCB) सुपूर्द करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात अत्यंत बारकाईने आणि युद्धपातळीवर सुरू आहे. पोलिसांनी आरोपीचा माग काढण्यासाठी विशेष पथके रवाना केली असून, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेतला जात आहे. पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या वेगवान तपासामुळे आरोपी लवकरच पोलिसांच्या जाळ्यात अडकणार असून, या क्रूर हत्याकांडाचा छडा लावून आरोपी लवकरच अटकेत असणार अशी शक्यता आता बळावली आहे.