भिसी / चंद्रपूर: Bhisi Road Accident मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील भिसीजवळ भीषण अपघात घडला. मुक्ताई धबधबा पाहण्यासाठी नागपूरहून आलेल्या कॉलेज विद्यार्थ्यांच्या दुचाकींना भरधाव कारने जोरदार धडक दिली. या अपघातात रिया देवागीरकर हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मैथली सावंत गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. धडक देणारा अज्ञात व्हॅगनॉर चालक घटनास्थळावरून पसार झाला. भिसी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
मुक्ताई धबधब्याकडे जाताना विद्यार्थ्यांवर संकट
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथील कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे सहा मित्र-मैत्रिणी रविवारी सकाळी दोन दुचाकींवरून चिमूर तालुक्यातील मुक्ताई वॉटर फॉल (धबधबा) बघण्यासाठी निघाले होते. यामध्ये मैथली संतोष सावंत (१९), मोहीत दिनेश घटारे (१९), ध्वनी गजानन कामळे (२०), खुशी हरीदास इंगळे (१९), रिया राजू देवागीरकर (२१) आणि ट्विंकल किशोर चिकाटे (२१) यांचा समावेश होता. दुपारी ११:३० वाजेच्या सुमारास चिमूर मार्गावरील टाका फाट्याजवळ पाणी पिण्यासाठी सर्वांनी आपल्या दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबवल्या. (हे हि वाचा – चंद्रपूर अंमली पदार्थ मुक्त करणार – पोलीस अधीक्षक नोपानी)
त्याच वेळी मागून अत्यंत भरधाव वेगात व निष्काळजीपणे आलेल्या एका ग्रे रंगाच्या व्हॅगनॉर कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन्ही दुचाकींना जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, रिया देवागीरकर ही रस्त्याच्या बाजूला गंभीर अवस्थेत फेकली गेली, तर मैथली सावंत रस्त्यालगतच्या शेतात जाऊन पडली. या अपघातात रियाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तसेच मैथलीच्या पायाला, कोपराला व डोक्याला जबर मार लागला. अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून थेट पसार झाला.
अपघातात विद्यार्थिनीचा मृत्यू; मैत्रीण गंभीर जखमी
घटनेचे गांभीर्य ओळखून सोबत असलेल्या ध्वनी कामडे हिने तात्काळ १०८ रुग्णवाहिकेला संपर्क साधला. रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्यानंतर जखमींना तातडीने नागपूर येथील मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान दुपारी ४:०० वाजेच्या सुमारास डॉक्टरांनी तपासून रिया राजू देवागीरकर हिला मृत घोषित केले. जखमी मैथली सावंत हिला पुढील उपचारासाठी धंतोली येथील शंकरा सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयात हलवण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी जखमी मैथलीची मावशी स्नेहलता वनमाली सामल (३८, रा. नागपूर) यांच्या तक्रारीवरून भिसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्हॅगनॉर कार चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १०६(१), १२५(a), १२५(b), २८१ सह मोटर वाहन कायद्याच्या कलम १३४ व १८४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ठाणे प्रभारी अधिकारी मंगेश भोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बालकृष्ण जिभकाटे पुढील तपास करत असून, पसार झालेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेतला जात आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






