Chimur Power Line Theft : मांजरी–पळसगाव मार्गावरील चोरी झालेली वीज वाहिनी

चिमूर तालुक्यातील मांजरी–पळसगाव मार्गावर वीज वाहिनीची चोरी

User avatar placeholder
Written by Prakash Hande

August 3, 2026

चिमूर: Chimur Power Line Theft प्रकरणात चिमूर तालुक्यातील मांजरी–पळसगाव मार्गावर आरडीएसएस योजनेअंतर्गत उभारलेल्या नवीन वीज वाहिनीला चोरट्यांनी लक्ष्य केले. अज्ञात आरोपींनी सुमारे ₹७२ हजारांचे अल्युमिनियम तार आणि इन्सुलेटर चोरून नेले. विघ्ना प्रोजेक्ट्स लिमिटेडच्या तक्रारीवरून चिमूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे सरकारी वीज प्रकल्पाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. (हे हि वाचा – मुक्ताई धबधबा पाहन जीवावर बेतलं)

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर परिमंडळात महावितरणच्या (MSEDCL) माध्यमातून केंद्र शासनाच्या आर.डी.एस.एस. योजनेअंतर्गत नवीन विद्युत वाहिनी टाकण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या योजनेचे कंत्राट असलेल्या ‘विघ्ना प्रोजेक्ट्स लिमिटेड’ कंपनीचे सामान्य व्यवस्थापक मोहम्मद हिदायततुल्ला ईस्माईल (वय ५५, रा. अशोक वाटिका नगरी, वरोरा; मूळ रा. दावणगेरे, कर्नाटक) हे मागील १५ वर्षांपासून या कंपनीत कार्यरत आहेत.

मांजरी विद्युत उपकेंद्र ११ के.व्ही. अंतर्गत येणाऱ्या मांजरी ते पळसगाव रस्त्याच्या कडेला लोखंडी पोल उभारून नवीन वीज वाहिनीचे काम पूर्ण करण्यात येत होते. या मार्गावर ३ समांतर अल्युमिनियमचे तार टाकण्याचे काम २३ जून २०२६ रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत पूर्ण झाले होते. मात्र, २४ जून २०२६ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास चिमूर येथील कंपनीचे कर्मचारी विक्रम वंजारी यांनी व्यवस्थापक हिदायततुल्ला यांना फोनवरून मांजरी ते पळसगाव रोडवरील नवीन वीज वाहिनीचे अल्युमिनियमचे तार अज्ञातांनी कापल्याची माहिती दिली.

तब्बल ३,३०० मीटर तार आणि इन्सुलेटर लंपास

या घटनेची माहिती मिळताच हिदायततुल्ला यांनी सहकारी सुभाष केमेये यांच्यासह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पाहणीदरम्यान तब्बल १८ लोखंडी पोलवरील १,१० cut अंतरावरील ३ समांतर असलेल्या अल्युमिनियमच्या ३ हजार ३०० मीटर लांबीच्या तारा (किंमत सुमारे ७० हजार रुपये) आणि लोखंडी पोलवरील २ हजार रुपये किमतीचे ६ इन्सुलेटर, असा एकूण ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी कापून चोरून नेल्याचे निष्पन्न झाले.

परिसरात शोध घेऊनही चोरीला गेलेल्या साहित्याचा काहीही पत्ता न लागल्याने आणि कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची कल्पना दिल्यानंतर मोहम्मद हिदायततुल्ला ईस्माईल यांनी चिमूर पोलीस ठाण्यात उपस्थित राहून तक्रार नोंदवली. त्यांनी दिलेल्या तोंडी तक्रारीवरून चिमूर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३०३(२) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चिमूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश काशिनाथ देरकर करीत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment