विसापूर येथील सन्मित्र सैनिक स्कूलची इमारत

सन्मित्र सैनिक स्कूलमधील विद्यार्थी मृत्यू प्रकरणाचा उलगडा

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 9, 2026

विसापूर/चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील विसापूर येथील ‘सन्मित्र सैनिक स्कूल‘मध्ये १२ वर्षीय विद्यार्थ्याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता एक मोठी आणि धक्कादायक कलाटणी मिळाली आहे. सुरुवातीला पालकांकडून शाळा व्यवस्थापनावर निष्काळजीपणाचे आरोप केले जात असतानाच, रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी दिलेल्या अधिकृत माहितीमुळे या संपूर्ण घटनेमागचे दुर्दैवी सत्य समोर आले आहे. वडिलांच्या एका निर्णयामुळे या बालकाने टोकाचे पाऊल उचलून आपला जीव गमावल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. (गांधी चौकातील मोबाईल शॉपीला आग, वाचा हि बातमी)

जीवन विलास झरेकर (वय १२, रा. खांबाडा, ता. राजुरा, जि. चंद्रपूर) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी दिलेल्या माहितीनुसार, सैनिकी शाळेत जीवनचे हे पहिलेच वर्ष होते. ८ ऑक्टोबर रोजी जीवनला त्वचेशी निगडित (खाजेचा) त्रास सुरू झाला. यावर शाळा व्यवस्थापनाने त्याच्या वडिलांना तातडीने बोलावून घेतले आणि तो पूर्णपणे बरा होईपर्यंत त्याला गावी घेऊन जाण्याचा सल्ला दिला होता अशी माहिती आहे.

मात्र, वडिलांनी मुलाला बाहेर डॉक्टरांकडे नेऊन प्राथमिक उपचार केले आणि अवघ्या दोन तासांतच त्याला पुन्हा सैनिकी शाळेत आणून सोडले. गावी जाता येत नसल्याचे आणि पुन्हा त्याच वातावरणात राहावे लागत असल्याचे समजताच जीवन अत्यंत निराश झाला व सतत रडू लागला. याच उद्वेगातून त्याने वसतिगृहातील कॉटजवळ कपडे वाळत घालण्यासाठी बांधलेल्या नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.

घटनेच्या दिवशी नेमकं काय घडलं?

वडिलांनी जीवन ला शाळेजवळ आणले, त्याला खाऊ घेऊन दिले, मात्र त्याच्या मनात गावी न जाता शाळेत पुन्हा परतल्याने तो दुखी झाला, तो सतत रडत होता, वडील त्याला सोडून गावी निघाले असता तो बेडजवळ गेला, त्यावेळी सर्व मुले बाहेर मैदानात होती, तो ७ ते ८ मिनिटे रडतच होता, त्यानंतर बेडजवळील नायलॉन दोरीने गळफास घेतला. काही वेळात एक मुलगा त्याठिकाणी आला, समोरचे दृश्य बघताच त्याने थेट याची माहिती शिक्षकांना दिली मात्र तोवर वेळ निघून गेली होती.

सन्मित्र सैनिक स्कूल प्रशासनाची भूमिका

या सर्व घडामोडींवर सन्मित्र सैनिक शाळेचे प्राचार्य मोहन पाठक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. प्राचार्य पाठक म्हणाले की, “जीवनचा मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी घटना आहे. शाळा प्रशासनावरील निष्काळजीपणाचे आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत. ८ ऑक्टोबर रोजी त्याला त्रास झाल्यावर आम्ही स्वतः आधी त्याला डॉक्टरांकडे दाखवले होते. वडील आल्यावर आम्ही त्यांना ‘आउटपास’ देऊन मुलगा बरा होईपर्यंत त्याला गावी घेऊन जाण्यास सांगितले होते. मात्र वडील उपचारांनंतर दोन तासांतच त्याला परत सोडून गेले. गावी जाता न आल्याने जीवन नाराज होऊन रडत होता. जीवन हा अत्यंत हुशार विद्यार्थी होता, आम्ही पोलिसांना तपासात पूर्ण सहकार्य करत आहोत.”

ही संपूर्ण हृदयद्रावक घटना शाळेतील कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलीस व शाळा प्रशासनाने हे सर्व फुटेज मृत जीवनच्या वडिलांना प्रत्यक्ष दाखवले असून, पोलिसांच्या या तपासाने शाळा प्रशासनावरील सर्व संशयाचे ढग दूर झाले आहेत. एका बाजूला मुलाला गावी न नेण्याचा वडिलांचा निर्णय आणि दुसरीकडे नवीन वातावरणाचा बालमनावर पडलेला ताण, या दुर्दैवी प्रसंगामुळे एका १२ वर्षांच्या निष्पाप चिमुकल्याचा अंत झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून रामनगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment