चंद्रपूर: (Chandrapur Police News) चंद्रपूर शहरातील रामनगर पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत १९ वर्षीय तरुणीचा जीव वाचवला. रेल्वे रुळावर आत्महत्येच्या उद्देशाने गेलेल्या तरुणीला सुरक्षित ताब्यात घेऊन तिचे समुपदेशन करण्यात आले. नंतर तिला कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. या संवेदनशील कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. (चंद्रपूर पोलिसांच्या सतर्कतेने युवकाचा जीव वाचला)
चंद्रपूर शहरातील रामनगर पोलिसांच्या तत्परतेमुळे आणि दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एका १९ वर्षीय तरुणीचा जीव वाचवण्यात पोलिसांना यश आले आहे. ही तरुणी गोंदिया-चांदा फोर्ट रेल्वे मार्गावर आत्महत्येच्या उद्देशाने गेली होती, परंतु पोलिसांनी अत्यंत वेगाने चक्रे फिरवून तिला सुरक्षित ताब्यात घेतले. ३० जून २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजताच्या सुमारास ही थरारक घटना घडली. गोंदिया-चांदा फोर्ट रेल्वे रुळाच्या दिशेने एक तरुणी आत्महत्येच्या इराद्याने जात असल्याची गोपनीय माहिती रामनगर पोलिसांना मिळाली होती.
माहिती मिळताच वेळ न दवडता रामनगर पोलीस स्टेशनच्या ‘चार्ली-५’ पथकावरील पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर तळवेकर व पोलीस अंमलदार शशीकांत जिवतोडे यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांनी परिसरात शोधमोहीम राबवून रेल्वे रुळाजवळ पोहोचलेल्या त्या तरुणीला ऐनवेळी सुरक्षितपणे ताब्यात घेतले, ज्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला.
Chandrapur Police News : रामनगर पोलिसांनी तरुणीचा जीव कसा वाचवला?
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशी दरम्यान, सदर तरुणीने घरगुती किंवा वैयक्तिक कारणांमुळे प्रचंड मानसिक नैराश्यात येऊन हे टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. यानंतर रामनगर पोलीस ठाण्यात महिला पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या उपस्थितीत तिचे योग्य समुपदेशन (Counseling) करण्यात आले आणि तिला मानसिक धीर देण्यात आला. यानंतर तिच्या कुटुंबीयांना पोलीस स्टेशनमध्ये पाचारण करून संपूर्ण प्रकाराची सविस्तर माहिती देण्यात आली. आवश्यक ते कायदेशीर मार्गदर्शन आणि समज दिल्यानंतर, त्या १९ वर्षीय तरुणीला तिच्या आईच्या ताब्यात सुखरूप सोपवण्यात आले आहे. पोलिसांच्या या संवेदनशील आणि तत्पर कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर, चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षकांनी नागरिकांना जाहीर आवाहन केले आहे की, कौटुंबिक, वैयक्तिक अडचणी किंवा मानसिक तणावाचा सामना करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कुटुंबाने व समाजाने मानसिक आधार दिला पाहिजे आणि त्यांच्याशी सातत्याने संवाद साधला पाहिजे. जर आपल्या आजूबाजूला कोणतीही व्यक्ती मानसिक नैराश्यामुळे असे टोकाचे पाऊल उचलण्याच्या मानसिकतेत असल्याचे निदर्शनास आल्यास, नागरिकांनी त्वरित ‘११२’ या आपत्कालीन क्रमांकावर किंवा जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. नागरिकांनी वेळेवर दिलेल्या सतर्कतेच्या माहितीमुळे अनेकांचे अमूल्य प्राण वाचू शकतात, असा विश्वासही पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






