वरोरा – Pensioner Cyber Fraud चे आणखी एक प्रकरण वरोरा येथे समोर आले आहे. बँकेचे जीवन प्रमाणपत्र अपडेट करण्याच्या नावाखाली ६८ वर्षीय सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्याची १० लाख ५० हजार रुपयांची फसवणूक झाली. ४ नोव्हेंबर २०२६ रोजी फेसबुकवरील लिंक आणि व्हॉट्सॲपवरील एपीके फाईलमुळे हा प्रकार घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी चंद्रपूर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (चंद्रपुरात खुलेआम चालतो जुगार, वाचा बातमी)
Pensioner Cyber Fraud: फसवणूक कशी झाली?
चंद्रपूर शहरात सायबर गुन्हेगारांचे जाळे दिवसेंदिवस किती वेगाने पसरत आहे, याचे एक अत्यंत संतापजनक आणि डोळे उघडणारे प्रकरण समोर आले आहे. बँकेचे जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) ऑनलाइन अपडेट करण्याच्या नादात एका ६८ वर्षीय सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला तब्बल १० लाख ५० हजार रुपयांना गंडा घालण्यात आल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, बँक ऑफ इंडियाच्या वरोरा शाखेतून २००९ मध्ये सेवानिवृत्त झालेले आनंदराव मुकुंदराव वानखेडे हे स्वतः या (Pensioner Cyber Fraud) सायबर फसवणुकीचे बळी ठरले असून, याप्रकरणी चंद्रपूर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pensioner Cyber Fraud, फेसबुक लिंक आणि एपीके फाईलचा वापर
प्राप्त माहितीनुसार, आनंदराव वानखेडे हे त्यांच्या पत्नीसह मातोश्री नगर आनंदवन, बोर्डा, वरोरा येथे वास्तव्य करतात. बँक ऑफ इंडिया शाखा वरोरा येथे त्यांची सेविंग आणि पेन्शन अशी दोन खाती आहेत. दरवर्षी नियमानुसार त्यांना आपले जीवन प्रमाणपत्र बँक खात्यासाठी अपडेट करावे लागते, मात्र यावर्षी त्यांनी ते वेळेत केले नव्हते. हीच संधी साधत सायबर भामट्यांनी त्यांच्यासोबत हा सगळा बनाव रचला. गत ४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आनंदराव फेसबुक बघत असताना त्यांना बँक ऑफ इंडियाचे लाइफ सर्टिफिकेट अपडेट करण्याबाबतची एक लोगो असलेली लिंक दिसली. त्यांनी त्यावर क्लिक केल्यानंतर काही वेळातच त्यांच्या मोबाईलवर दीपककुमार शर्मा नावाच्या व्यक्तीचा ‘हाय सर, गुड मॉर्निंग’ असा मेसेज आला. त्यानंतर त्यांना एका मोबाईल नंबरवरून फोन आला आणि समोरच्या व्यक्तीने आपण बँक ऑफ इंडियाचा कर्मचारी बोलत असल्याचे भासवले.
Pensioner Cyber Fraud, खात्यातून १० लाख ५० हजार काढले गेले
संबंधित भामट्याने ग्राहकाला विश्वासात घेऊन जीवन प्रमाणपत्र अपडेट करण्यासाठी व्हॉट्सॲपवर एक एपीके (APK) फाईल पाठवली आणि ती त्वरित मोबाईलमध्ये इन्स्टॉल करण्यास सांगितले. वृद्ध सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने ती फाईल उघडल्यानंतर आरोपींनी त्यांना मोबाईल नंबर, एटीएम कार्ड नंबर आणि एटीएमचा पिन नंबर विचारला. बँकेचे काम सुरळीत चालण्यासाठी ही माहिती आवश्यक असल्याचे सांगून त्यांनी आनंदरावांकडून सर्व तपशील भरून घेतला आणि फाईल सबमिट करून घेतली. दुपारी चार वाजेपर्यंत प्रमाणपत्र अपडेट होईल, असा संदेश आरोपींनी त्यांना दिला. त्यानंतर थोड्याच वेळात ‘जीवन प्रमाणपत्र ९८ टक्के पूर्ण’, त्यानंतर पुन्हा तोच संदेश आणि नंतर ‘केवायसी १०० टक्के पूर्ण’ झाल्याचे एकामागोमाग एक बनावट मेसेज आनंदराव यांच्या फोनवर येऊ लागले.
थोड्या वेळातच त्यांच्या बँक खात्यातून पैसे कट झाल्याचे चार वेगवेगळे मेसेज धडकले. बँक खात्यातून सुरुवातीला ५ लाख रुपये, त्यानंतर पुन्हा ५ लाख रुपये आणि इतर ट्रान्झॅक्शनद्वारे एकूण १० लाख ५० हजार रुपये परस्पर काढून घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले. प्रकार लक्षात येताच आनंदराव यांनी तातडीने बँक ऑफ इंडियाची वरोरा शाखा गाठली आणि बँक व्यवस्थापकांना याची संपूर्ण माहिती दिली. व्यवस्थापकांनी तातडीने खात्याचे स्टेटमेंट तपासले असता, ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार ते पाच वाजेच्या दरम्यान त्यांच्या खात्यातून विविध ट्रान्झॅक्शन आयडीद्वारे १० लाख ५० हजार रुपयांची मोठी रक्कम परस्पर लाटण्यात आल्याचे उघडकीस आले. या संपूर्ण प्रकरणात सायबर चोरांनी अत्यंत चलाखीने बँक कर्मचाऱ्याचे सोंग घेऊन आणि बनावट एपीके फाईलच्या माध्यमातून मोबाईलचा ताबा मिळवून हा घात केला आहे.
कोणत्या कलमांनुसार गुन्हा नोंद?, Pensioner Cyber Fraud
या प्रकरणी पीडित आनंदराव वानखेडे यांच्या तक्रारीवरून चंद्रपूर सायबर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम (IT Act) २०२०० च्या कलम ६६(सी), ६६(ड) तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३(५), ३१८(४), ३१९(२) आणि ६१(२) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून, प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. वृद्धांना आणि पेन्शनर्सना अशा प्रकारे सॉफ्टवेअर किंवा एपीके फाईलच्या जाळ्यात अडकवून सायबर गुन्हेगार कसे लुटत आहेत, याचा हा संतापजनक प्रकार समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now







