बालविवाहमुक्त चंद्रपूर अभियानाच्या जनजागृती रथाला हिरवी झेंडी दाखवताना आमदार किशोर जोरगेवार.

मुलींचे बालपण हिरावणाऱ्या प्रथेविरोधात चंद्रपूर सज्ज; १०० दिवसीय अभियानाला सुरुवात

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 27, 2026

चंद्रपूर – बालविवाहमुक्त चंद्रपूर अभियानाचा शुभारंभ २७ नोव्हेंबर रोजी नियोजन भवन येथे करण्यात आला. आमदार किशोर जोरगेवार यांनी बालविवाह रोखण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले. यावेळी १०० दिवसीय बालविवाहमुक्त भारत जनजागृती अभियानाला सुरुवात झाली. जनजागृती रथाला जोरगेवार यांनी हिरवी झेंडी दाखवली. (चंद्रपुरात शिवसेनेला धक्का, वाचा बातमी)

बालविवाह ही केवळ एक सामाजिक अनिष्ट प्रथा नसून बालकांच्या भविष्यावर, शिक्षणावर आणि त्यांच्या स्वप्नांवर परिणाम करणारी गंभीर समस्या आहे. बालविवाह रोखण्यासाठी केवळ कायद्याची अंमलबजावणी पुरेशी नाही, तर समाजातील प्रत्येक घटकाने यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. मुलींना शिक्षणाची संधी, सुरक्षित वातावरण आणि स्वतःचे भविष्य घडविण्याचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. बालविवाहमुक्त समाज निर्माण करण्यासाठी लोकसहभागातून व्यापक जनजागृती करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. (बालविवाहमुक्त चंद्रपूर )

बालविवाहमुक्त चंद्रपूर अभियानाचा शुभारंभ

   आंतरराष्ट्रीय बालविवाह निर्मूलन दिनानिमित्त २७ नोव्हेंबर रोजी नियोजन भवन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. बालहक्कांसाठी कार्यरत आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्था आणि ग्रामीण व शहरी विकास युवक संघटना, गडचिरोली, जिल्हा महिला व बालकल्यान विभाग, चंद्रपूर, जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १०० दिवसीय बालविवाहमुक्त भारत जनजागृती अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी जनजागृती रथाला आमदार किशोर जोरगेवार यांनी हिरवी झेंडी दिली. यावेळी दामा बासरकर, मिनाक्षी भस्मे, जोत्स्ना मोहितकर, देवगडे, अतिष कुमार चव्हाण, प्रलय मशाखेत्री, सुमित बेले, मयुर वाढई आदिंची उपस्थिती होती.

   यावेळी पूढे बोलताना आ. किशोर जोरगेवार म्हणाले की, बाल विवाहामुळे मुलांचे बालपण हिरावले जाते. विशेषतः मुलींच्या शिक्षणात अडथळे निर्माण होतात आणि त्यांच्या शारीरिक, मानसिक व सामाजिक विकासावर परिणाम होतो. त्यामुळे पालक, शिक्षक, सामाजिक संस्था, ग्रामपंचायती आणि प्रशासन यांनी एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता आहे. बालविवाहाची माहिती मिळाल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच संबंधित यंत्रणांना कळवावे. समाजातील प्रत्येकाने बालविवाह रोखण्याची जबाबदारी स्वीकारली, तरच या अनिष्ट प्रथेचे समूळ उच्चाटन शक्य होईल.

बालविवाहमुक्त चंद्रपूर : बालविवाह प्रतिबंधासाठी लोकसहभागाचे आवाहन

    बालकांचे संरक्षण, त्यांच्या हक्कांची जपणूक, बालकांवरील लैंगिक अत्याचार, बाल तस्करी आणि बालमजुरी यांसारख्या समस्यांविरोधातही समाजाने जागरूक राहिले पाहिजे. मुलांचे भविष्य सुरक्षित करणे ही केवळ शासनाची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाचे कर्तव्य आहे. प्रत्येक बालकाला शिक्षण, सन्मान आणि सुरक्षित बालपण मिळाले पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले.

   केंद्र शासनाच्या निर्देशानुसार २७ नोव्हेंबर २०२६ ते ७ मार्च २०२७ या कालावधीत १०० दिवसीय बालविवाहमुक्त भारत जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून गावोगावी जनजागृती, ग्रामसभांमधून चर्चा, शाळा-महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रम तसेच स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने बालविवाह प्रतिबंधासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

   ग्रामीण व शहरी विकास युवक संघटनेच्या वतीने २०२३ पासून चंद्रपूर जिल्ह्यात बालविवाह, बालकांवरील लैंगिक अत्याचार, बाल तस्करी आणि बालमजुरी यांसारख्या गंभीर सामाजिक समस्यांच्या निर्मूलनासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. या सामाजिक अभियानाला लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

  बालविवाहमुक्त चंद्रपूर हे केवळ अभियानाचे उद्दिष्ट न राहता प्रत्येक गावाचा आणि कुटुंबाचा संकल्प बनला पाहिजे. मुलांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी केले.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

2 thoughts on “मुलींचे बालपण हिरावणाऱ्या प्रथेविरोधात चंद्रपूर सज्ज; १०० दिवसीय अभियानाला सुरुवात”

Leave a Comment