Emerging Political Leader : चंद्रपूर - राजकारण म्हणजे केवळ सत्तेची गणिते नव्हेत, तर समाजाला दिशा देणारे नेतृत्व घडविण्याची जबाबदारीही असते. ही जबाबदारी सातत्याने आणि प्रामाणिकपणे पार पाडणारे नेते म्हणून आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांची ओळख आज ठळकपणे पुढे येत आहे. नव्या चेहऱ्यांना संधी देत त्यांना घडविणे, विश्वास देणे आणि नेतृत्वाच्या प्रवाहात आणणे, हीच त्यांच्या राजकारणाची खरी ओळख ठरली आहे. (चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक प्रभागनिहाय निकाल)
२०१२ पासून भारतीय जनता पक्षात सक्रियपणे कार्यरत असतानाच आमदार जोरगेवार यांनी केवळ स्वतःची राजकीय वाटचाल न करता अनेक नव्या कार्यकर्त्यांना पुढे आणले. त्या काळात घडविलेल्या नेतृत्वातील अनेकांनी पुढे पक्षात विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या. ही बाबच त्यांच्या नेतृत्वनिर्मितीच्या क्षमतेची साक्ष देणारी आहे.
यानंतर त्यांनी ‘यंग चांदा ब्रिगेड’ या संघटनेची स्थापना करून सामाजिक व युवा चळवळीला नवी दिशा दिली. या संघटनेच्या माध्यमातूनही अनेक तरुण चेहरे पुढे आले. संघटनात्मक काम, सामाजिक बांधिलकी आणि जनतेशी थेट संपर्क याचा संस्कार या नव्या नेतृत्वावर रुजविण्याचे काम आमदार जोरगेवार यांनी केले. Emerging Political Leader
यंदाच्या महापालिका निवडणुकीतही आमदार जोरगेवार यांनी आपल्या भूमिकेला तडा जाऊ दिला नाही. नव्या चेहऱ्यांवर विश्वास टाकत त्यांना थेट नगरसेवक पदापर्यंत पोहोचविण्याचे धाडस त्यांनी केले आणि जनतेनेही त्या विश्वासावर शिक्कामोर्तब केले.
या नव्या नेतृत्वात आदिवासी समाजातून आलेले, जनसेवेची तीव्र भावना असलेले जितेश कुळमेथे, सतत नागरिकांच्या संपर्कात राहणाऱ्या आणि सामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या आशा देशमुख, रॉबिन बिश्वास तसेच नितेश गवळी यांचा समावेश आहे. यासोबतच अमोल शेंडे, सायली येरणे, वंदना हातगावकर, सुमित बेले, राशेद हुसेन, राकेश पिंपळकर, भाग्येश्री हांडे, सविता दंढारे यांसारख्या अनेक नव्या चेहऱ्यांना त्यांनी संघटनेत संधी देत राजकीय प्रवाहात आणले आहे.
आजच्या राजकारणात जिथे प्रस्थापित चेहरेच संधी मिळवतात, तिथे आमदार किशोर जोरगेवार नव्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आजचा कार्यकर्ता हा उद्याचा नेता या विचाराला प्रत्यक्षात उतरवत आहेत. म्हणूनच ते केवळ यशस्वी आमदार नाहीत, तर भविष्यातील नेतृत्व घडविणारा दूरदृष्टी असलेला नेता म्हणून ओळख निर्माण करत आहेत.
Leave a Comment