Live-in Relationship Murder । चंद्रपूर हादरलं! एकाच दिवसात दुसरी हत्या; चार्जर वायरने गळा आवळून प्रेयसीची हत्या

April 03, 2026 by Prakash Hande

Live-in Relationship Murder : चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर शहरात एका दिवसात दुसऱ्या हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वतःपेक्षा सात वर्षांनी मोठ्या असलेल्या प्रेयसीचा मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला. इतकेच नव्हे तर हा प्रकार आत्महत्या असल्याचा बनाव करण्याचाही आरोपीने प्रयत्न केला; मात्र शवविच्छेदन अहवालामुळे सत्य बाहेर आले आणि पोलिसांनी आरोपीला अटक केली. (चारित्र्यावर संशय, दुर्गपुरात युवकाची हत्या)

 

अंकेश योगेश बहीरवार (वय २२, रा. सोनापूर, ता. सावली) असे अटकेतील आरोपीचे नाव असून, प्रियंका वांढरे (वय २९, रा. तुकूम) असे मृत महिलेचे नाव आहे.

माहितीनुसार, प्रियंका ही पतीपासून विभक्त राहत होती. याच काळात तिची ओळख अंकेशशी झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघेही प्रियंकाच्या घरी लिव्ह-इनमध्ये राहू लागले. मात्र, काही दिवसांपासून त्यांच्यात आर्थिक कारणांवरून तसेच किरकोळ वादांवरून सतत भांडणे होत होती. प्रियंका आपल्यावर नियंत्रण ठेवते आणि कुटुंबीयांशी संपर्क ठेवू देत नाही, या रागातून अंकेशने टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे.

 

आत्महत्येचा बनाव उघडकीस

१४ मार्च २०२६ च्या रात्री अंकेशने प्रियंकाच्या वडिलांना फोन करून “ती काही बोलत नाही, बहुधा तिने आत्महत्या केली असावी” असे सांगून घाबरवण्याचा प्रयत्न केला. कुटुंबीयांनी तत्काळ घरात जाऊन पाहिले असता प्रियंका बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिला रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

प्रारंभी हा प्रकार आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, शवविच्छेदन अहवालात गळा आवळल्यामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी संशयित अंकेशला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

 

हत्येसाठी वापरलेले साहित्य जप्त

दुर्गापूरचे पोलीस निरीक्षक आयपीएस गौरव कायंदेपाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळावरून मोबाईल चार्जरची वायर आणि एक्सटेंशन बोर्ड जप्त केला आहे.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

या घटनेमुळे दुर्गापूर परिसरात खळबळ उडाली असून, लिव्ह-इन संबंधातील तणावाचे गंभीर परिणाम पुन्हा एकदा समोर आले आहेत.

Leave a Comment

+