"चित्रपट की डोकेदुखी?" शाहिदच्या 'ओ रोमियो'ला प्रेक्षकांनी नाकारलं? वाचा सविस्तर रिव्ह्यू

February 13, 2026 by Prakash Hande

O Romeo Movie Review : मनोरंजन - दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांचा महत्त्वाकांक्षी चित्रपट ओ रोमियो 13 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. शाहिद कपूर, तृप्ति डिमरी, अविनाश तिवारी, नाना पाटेकर, फरीदा जलाल, दिशा पाटनी आणि तमन्ना भाटिया यांच्या प्रमुख भूमिका असून विक्रांत मैसी विशेष भूमिकेत दिसतात. चित्रपट प्रदर्शनापूर्वीपासूनच कथानकावरून वादाच्या भोवऱ्यात होता. (रातोरात स्टार झाली मात्र एका घटनेने करिअर उध्वस्त)

 

कथा

‘ओ रोमियो’ची कथा एका सुपारी किलरभोवती फिरते. शाहिद कपूर साकारत असलेला रोमियो बिनधास्त, बेफिकीर आणि थोडासा बेदरकार आयुष्य जगणारा आहे. त्याच्या आयुष्यात तृप्ति डिमरीची एन्ट्री होते आणि त्याचे जग अक्षरशः उलटेपालटे होते. प्रेम, आसक्ती, वेड आणि त्यातून निर्माण होणारी शोकांतिका – या सगळ्यांचा प्रवास चित्रपट दाखवतो.

कथानकात काही ठिकाणी ‘देवदास’सदृश भावनिक छटा जाणवतात. मात्र, ज्या ठिकाणी कथा अधिक प्रभावी व टोकदार व्हायला हवी होती, तिथे ती लांबलचक मांडणीमुळे कमकुवत ठरते. ३० मिनिटांची काटछाट झाली असती, तर चित्रपट अधिक प्रभावी ठरला असता.

 

अभिनय – जुलिएट भारी!

शाहिद कपूरने याआधी साकारलेल्या आक्रमक, रागीट भूमिकांची झलक इथेही दिसते. त्याचा अभिनय प्रभावी असला तरी फारसा नवीनपणा जाणवत नाही.

मात्र तृप्ति डिमरीने आपल्या भूमिकेला दिलेली भावनिक खोली उल्लेखनीय आहे. तिच्या सादरीकरणामुळे अनेक ठिकाणी तीच कथानकावर वर्चस्व गाजवताना दिसते. खरं तर चित्रपटाचे नाव ‘ओ जुलिएट’ असते, असे वाटावे इतकी तिची भूमिका प्रभावी आहे.

नाना पाटेकर नेहमीप्रमाणे दमदार उपस्थिती नोंदवतात. त्यांची भूमिका थोडी असली तरी ठसा उमटवणारी आहे.

 

दिग्दर्शन – अपेक्षाभंग

‘मकबूल’, ‘कमीने’, ‘इश्किया’ आणि ‘हैदर’सारखे उत्कृष्ट चित्रपट देणाऱ्या विशाल भारद्वाजांकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा मोठ्या होत्या. मात्र ‘ओ रोमियो’मध्ये कथानकाची एकसंधता हरवलेली जाणवते. काही प्रसंग स्वतंत्रपणे प्रभावी वाटतात, पण संपूर्ण चित्रपट एकत्रित पाहिला असता तो भटकल्यासारखा वाटतो.

हा ना पूर्णपणे गँगस्टर ड्रामा ठरतो, ना प्रभावी प्रेमकथा. दोन्हींच्या दरम्यान अडकलेली कथा शेवटी अपेक्षित परिणाम साधू शकत नाही. O Romeo Movie Review

 

अंतिम मत

‘ओ रोमियो’मध्ये चांगले कलाकार, प्रभावी क्षण आणि भावनिक शक्यता असूनही सशक्त पटकथा आणि संपादनाच्या अभावामुळे चित्रपट अपेक्षाभंग करतो. शाहिद किंवा तृप्तिचे चाहते असल्यास एकदा पाहण्यास हरकत नाही; मात्र विशाल भारद्वाजांच्या पूर्वीच्या उत्कृष्ट चित्रपटांची उंची गाठण्यात हा चित्रपट अपयशी ठरतो.

रेटिंग: ⭐⭐ (२/५)

Leave a Comment

+