"महापौर मीच बनवला!" मुनगंटीवारांच्या दाव्यावर जोरगेवार भडकले

February 11, 2026 by Prakash Hande

Sudhir Mungantiwar vs Kishor Jorgewar : चंद्रपूर - चंद्रपुरात अंतर्गत गटबाजीमुळे कांग्रेसने हातची सत्ता गमावली, कांग्रेसच्या तोंडातून घास हिसकवणाऱ्या भाजपने आपल्या पक्षाचा महापौर मनपात बसविला, यानंतर भाजप पक्षात श्रेयवादाची लढाई सुरु झाली म्हणजेच गटबाजीचा दुसरा अध्याय. शिवसेना ठाकरे पक्षाने भाजपला समर्थन देत मनपात भाजपची सत्ता आणली. भाजप तर्फे संगीता खांडेकर महापौर तर उबाठा चे प्रशांत दानव हे उपमहापौर पदी विराजमान झाले. यावरून आता भाजपात क्रेडिट वॉर सुरु झाला आहे, महापौर मी निवडून आणला असे भाजपचे दोन्ही नेते प्रसारमाध्यमांना सांगत सुटले आहे. (१८ फेब्रुवारीला राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर चंद्रपुरात)

 

यामागील सत्तेची स्टोरी काय होती? याबाबत भाजपचे जेष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलून दाखवली. जोरगेवार गटाला गटनेता मिळाल्यावर पक्षाने कार्यकर्त्याचा सन्मान करीत संगीता खांडेकर यांचे नाव महापौर पदाकरिता पुढे केले, महापौर पदाकरिता उमेदवारी अर्ज दाखल झाल्यावर जोरगेवार गटाने सारिका संदुरकर यांना सुद्धा महापौर पदासाठी अर्ज दाखल करायला सांगितले. 

 

पक्षाने खांडेकर यांचे नाव अधिकृतरीत्या जाहीर केल्यावर जोरगेवार यांनी पक्ष शिस्तीचा भंग केला, एकतर निवडणूक काळात १७ एबी फॉर्म ची चोरी करण्यात आली, त्यामुळे भाजपला मनपा निवडणुकीत बहुमत मिळाले नाही, पक्षातील सक्षम उमेदवारांना डावलण्यात आले. फॉर्म चोरीनंतर पक्षाचे केवळ २३ नगरसेवक निवडून आले, महापौर पदाच्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी पक्षाने मला दिली व मी ती जबाबदारी योग्यरित्या पार करीत मनपात भाजपची सत्ता आणली. आता श्रेयवाद घेण्यासाठी जोरगेवार पुढे येत आहे, उबाठा सोबत सत्तेची विभागणी करण्यासाठी मी स्वतः स्टॅम्प पेपरवर करार करायला लावला. जोरगेवार यांनी सुरुवातीपासून जे केलं त्यावर पक्षाने गंभीर दखल घेतली असून त्यांच्यावर कारवाई होणार आहे.

 

मुनगंटीवार यांच्या वक्तव्याचा आमदार जोरगेवार यांनी खरपूस समाचार घेत, पक्षाने जबाबदारी दिली होती तर वेळेवर जबलपूर जाण्याची गरज काय होती, मी माझ्या कुटुंबातील कार्यक्रम सोडून पक्षाला वेळ दिला, आणि मुनगंटीवार हे माध्यमांसमोर येत सगळं मी केलं हे सांगतात. पक्ष काय कारवाई करणार हे पुढे कळेल, जिल्ह्याला मंत्रिपद दिलं नाही हि कारवाई पक्षाने तुमच्यावर केली. सत्तेसाठी जुळवाजुळव कोण केली? महापौर आता बनणार नाही हे कळताच मुनगंटीवार जबलपूर मध्ये गेले. हि त्यांची कसली जबाबदारी आहे. पक्षाकरिता मी दिवसरात्र एक करीत महापौर निवडून आणला, आणि मुनगंटीवार स्वतः श्रेय घेतात.

 

महापौर निवडीनंतर मुनगंटीवार यांच्या सांगण्यावरून स्वतःला किंगमेकर, धुरंधर असे बॅनर घेऊन त्यांचे समर्थक आले होते, आम्ही पक्षासाठी सर्व केलं, पण ते विसरले, मला विधानसभेची उमेदवारी न मिळावी याकरिता मुनगंटीवार हे आपल्या समर्थकाला सोबत घेत विमानाने दिल्लीला गेले होते, जोरगेवार यांना उमेदवारी दिली तर मी राजीनामा देणार अशी धमकी त्यांनी पक्षश्रेष्ठीला दिली होती. त्याचे परिणाम काय झाले हे आपण सर्वानी बघितले आहे. Sudhir Mungantiwar vs Kishor Jorgewar

पक्षाने संगीता खांडेकर यांच्या नावाला महापौर पदासाठी उमेदवार केले हे योग्यच होते, त्यांचा अर्ज बाद होऊ नये याकरिता मी सारिका संदुरकर यांना महापौर पदाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले होते. मुनगंटीवार म्हणतात कि स्टॅम्प पेपरवर करार केला, त्या कराराला कोण विचारतं, मनपा सभागृहात फ्लोर टेस्ट महत्वाचा असतो करार नाही. मध्यरात्री जागून मी सत्तेची जुळवाजुळव केली आणि पक्षाचा उमेदवार निवडून आणला. आणि मुनगंटीवार आता श्रेय घेत आहे. 

 

कांग्रेस नंतर आता भाजप पक्षात श्रेयवाद सुरु झाला आहे. निवडणूक नंतरची कांग्रेसची परिस्थिती जनतेनी बघितली, बहुमताच्या अगदी जवळ असताना सुद्धा कांग्रेस सत्तेपासून वंचित राहिला. आता तीच परिस्थिती सत्ता आल्यावर भाजपात निर्माण झाली आहे. येणाऱ्या काळात भाजपातील हा संघर्ष तीव्र होणार कि शमणार हे कळेलचं.

Leave a Comment

+