"२५ वर्षांत शिक्षण व्यवस्था कोलमडणार?" आमदारांनी व्यक्त केली मराठी शाळांच्या भवितव्याबद्दल भीती

February 02, 2026 by Prakash Hande

Vidarbha Shikshak Sangh : चंद्रपूर : शिक्षकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आपल्याला आपली ही एकजूट अधिक भक्कम करावी लागेल. सभागृहात आम्ही तीन आमदार आहोतच, पण आता चौथा भक्कम आधार म्हणून दिलीपराव कडू यांना निवडून देणे, हे आपले कर्तव्य आहे. विदर्भातील ही शिक्षक संघटना आणि आपली ताकद येणाऱ्या काळात निश्चितपणे बदल घडवून आणण्यासाठी अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत शिक्षकांच्या समस्यांची जाणीव असलेला शिक्षक संघटनेचा उमेदवार दिलीप कडू यांना सभागृहात पाठवा व शिक्षकांनी कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नका, असे आवाहन आमदार धिरज लिंगाडे, आमदार सुधाकर अडबाले, आमदार ॲड. अभिजीत वंजारी यांनी केले. (अजब प्रकार - चंद्रपुरात कांग्रेस नगरसेवकांच्या घरावर बैठकीचे नोटीस)

राज्‍यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या ज्‍वलंत विषयांवर चर्चा करून त्यावर प्रभावी उपाययोजना करता यावी म्हणून विदर्भस्तरीय शिक्षक मेळावा ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी २०२६ रोजी संतनगरी शेगाव (जि. बुलढाणा) येथील गणेश  प्रस्थ मंगल कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेला होता. ३१ जानेवारी रोजी कार्यकर्ता परिसंवाद पार पडला. त्‍यानंतर काल १ फेब्रुवारी रोजी मेळावा उद्‌घाटन व स्‍मरणिका प्रकाशन सोहळा थाटात पार पडला.

यावेळी अध्यक्षस्‍थानी माजी आमदार व्‍ही. यू. डायगव्हाणे, उद्‌घाटक म्‍हणून आमदार धिरज लिंगाडे, मार्गदर्शक म्‍हणून विमाशि संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले, प्रमुख पाहुणे म्‍हणून आमदार ॲड. अभिजीत वंजारी, विमाशि संघाचे प्रांतीय अध्यक्ष अरविंद देशमुख, महा. राज्य आयटीआय निदेशक संघटनेचे सल्लागार भोजराज काळे, महाराष्ट्र आश्रम शाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे राज्य सरचिटणीस किसन पुंड, आदिवासी आश्रम शाळा शिक्षक संघटनेचे रामदास खवशी, अमरावती शिक्षक मतदार संघाचे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे अधिकृत उमेदवार दिलीप कडू, महामंडळाचे पदाधिकारी, जगदीश जुनघरी, महेंद्र सालंकार, विनायक उज्‍जैनकर, निलीमा मांढरे, विमाशि संघाचे प्रांतीय उपाध्यक्ष रमेश काकडे, विजय ठोकळ, जयदीप सोनखासकर, जयप्रकाश थोटे, विभागीय कार्यवाह बाळासाहेब गोटे, चंद्रशेखर रहांगडाले, कोषाध्यक्ष भूषण तल्‍हार, विदर्भ मुख्याध्यापक संघाचे सचिव सुरेंद्र कडू, राज्‍य शिक्षक संघाचे अध्यक्ष अनिल भारसाकळे, आशुतोष लांडे, मंगेश पूंडकर, दिलीप शिरभाते आदींची मंचावर उपस्‍थिती होती.

या मेळाव्यात विमाशि संघाने आजवर केलेल्‍या कार्याचा आढावा घेणारी 'संघर्ष' या स्मरणिकेचे प्रकाशन मान्‍यवरांच्या हस्‍ते करण्यात आले. यावेळी संपादक प्रभाकर पारखी यांचा सत्‍कार करण्यात आला. तसेच दैनिक निर्मल विदर्भ ने काढलेल्‍या विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले.

आज मराठी माध्यमाच्या शाळा टिकवण्यासाठी शासन स्तरावर उदासीनता दिसत आहे. एकीकडे आपण मराठीला 'अभिजात भाषेचा' दर्जा मिळाल्याचा अभिमान बाळगतो, पण दुसरीकडे मराठी शाळांना वेतनेतर अनुदान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. २००९ पासून अनेक शाळांना एक रुपयाही वेतनेतर अनुदान मिळालेले नाही. आज या शाळा शासनाच्या भरोशावर नाही, तर तुमच्यासारख्या प्रामाणिक शिक्षकांच्या जिद्दीवर सुरू आहेत. विद्यार्थी टिकावा म्हणून तुम्ही स्वतः पदरमोड करून मुलांना सायकली, पुस्तके आणि गणवेश वाटता. ही शाळांची ओढ आणि विद्यार्थ्यांचे भविष्य तुमच्यामुळेच सुरक्षित आहे, अशी टीका आमदार सुधाकर अडबाले यांनी केली. शिक्षकांना टीईटी (TET) परिक्षा सक्‍ती, १४ मार्च २०२४ चा शासन निर्णय (संचमान्यता), शाळेचा विद्यार्थी पट, जुनी पेंशन योजना, टप्‍पा वाढ अनुदान व इतर शिक्षकांच्‍या प्रश्‍नांवर मार्गदर्शन करीत ते सोडविण्यासाठी सभागृहात आम्‍ही तीनही आमदार एकसंघ आवाज उठवित असतो, असे आमदार सुधाकर अडबाले म्‍हणाले. Vidarbha Shikshak Sangh

आज मराठी माध्यमाच्या शाळांच्या भवितव्याचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या शाळा एकामागून एक बंद होत आहेत. अगदी अनुदानित शाळांची अवस्थाही दयनीय होत चालली आहे. केंद्र आणि राज्य सरकारचे सध्याचे धोरण असेच राहिले, तर येणाऱ्या २५ वर्षांत ही शिक्षण व्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडलेली असेल. मग मध्यमवर्गीय आणि गरिबांची मुले शिकणार कुठे? अशा परिस्थितीत समाज कसा प्रगत होणार? हा मूलभूत प्रश्न आपण सर्वांनी विचारण्याची वेळ आली आहे, अशी टीका आमदार अभिजित वंजारी यांनी यावेळी केली.

राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासाठी आपण सभागृहात सतत आवाज उठवित असून सभागृहाबाहेर देखील सर्वांनी एकजुटीने लढा द्यावा, असे आवाहन आमदार धिरज लिंगाडे यांनी बोलताना केले.

मेळाव्‍याचे प्रास्‍ताविक प्रांतीय अध्यक्ष अरविंद देशमुख, संचालन संगीता डांगे, नितीन गायकवाड यांनी तर आभार जयदीप सोनखासकर यांनी मानले. 

Leave a Comment

+