Chandrapur Dahi Handi
Chandrapur Dahi Handi : चंद्रपूर – दहीहंडी हा फक्त खेळ नाही तर भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जिवंत प्रतीक आहे. आपल्या इतिहासात आणि धर्मपरंपरेत दहीहंडीचे विशेष स्थान आहे. श्रीकृष्णाच्या बाललीलांतून धैर्य, साहस, चिकाटी आणि ऐक्याचा जो संदेश मिळतो, तोच आज या उत्सवातून युवकांना अनुभवायला मिळतो. आजच्या पिढीने हा उत्सव केवळ मनोरंजन म्हणून पाहू नये, तर त्यातून मिळणारे संस्कार आणि जीवनमूल्य आत्मसात करावेत, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार (mla kishor jorgewar) यांनी केले.
चंद्रपुरातील या मनपा शाळेला मिळणार १० कोटी रुपयांचा निधी
कृष्णजन्माष्टमी निमित्त तिरंगा क्रिकेट क्लब आणि शिवस्वाभिमान बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने तुकूम येथे दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, माजी नगरसेवक सुरेश पचारे, सतीश भिवगडे, भारतीय जनता पार्टीचे महामंत्री रवि गुरनुले, मंडळ अध्यक्ष स्वप्निल डुकरे, वर्षा कोटेकर, सतीश तायडे, प्रा. निलेश बेलखेडे, जसबीरसिंग बोपारा, सिकंदर खान आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
युवकांना एकत्र आणून समाजात सकारात्मकता पसरविण्याचे मोठे काम
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, विकासकामांनी शहराची ओळख निर्माण होत असते, हे सत्य असले तरी पारंपरिक व धार्मिक उत्सव देखील शहराची ओळख निर्माण करण्यासाठी आवश्यक आहेत. आपण चंद्रपूरात महाकाली महोत्सवाला सुरुवात केली आहे. त्यामुळे चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकालीची महती देशपातळीवर पोहोचली आहे. येथील भाविकांची संख्या लक्षणीय वाढत आहे. आज आपण दहीहंडी स्पर्धेचे उत्तम आयोजन केले आहे. तिरंगा क्रिकेट क्लब आणि शिवस्वाभिमान बहुउद्देशीय संस्थेने अशा पारंपरिक उत्सवाचे आयोजन करून केवळ धार्मिक परंपरा जोपासली नाही, तर युवकांना एकत्र आणून समाजात सकारात्मकता पसरविण्याचे मोठे काम केले आहे. अशा उपक्रमांमधून आपली संस्कृती जिवंत राहते आणि समाजातील बंधुभाव वृद्धिंगत होतो. Cultural values in Dahi Handi

ते पुढे म्हणाले की, युवकांनी पथक तयार करताना जसा एकमेकांवर विश्वास ठेवून मानवी पिरॅमिड उभारला, तसाच विश्वास, साहस आणि एकोप्याने आपण समाज उभारायला हवा. हाच खरा दहीहंडी उत्सवाचा संदेश आहे. दहीहंडी आपल्याला साहस आणि परिश्रमांशिवाय यश मिळत नाही, ही शिकवण देते. युवकांनी ही शिकवण आपल्या जीवनात उतरवली पाहिजे. अशा उत्सवांमुळे आपल्याला संस्कृतीची जाणीव तर होतेच, पण समाजातील ऐक्य, बंधुता आणि आपुलकी अधिक बळकट होते, असे ते यावेळी म्हणाले. दहीहंडी स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
