daylight tiger attack on cow
daylight tiger attack on cow : घुग्घुस, चंद्रपूर 24 ऑगस्ट 2025 : घुग्घुस शहरालगत असलेल्या नकोडा गावाजवळ वाघाच्या हल्ल्यात एका गाईचा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ही घटना रविवारी (24 ऑगस्ट 2025) दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.
पिता-पुत्राला अस्वलाने पकडले आणि….
नागरिक दहशतीमध्ये
नकोडा येथील वेकोलि मॅगझीनजवळ ही घटना घडली. वाघाने अचानक एका गाईवर हल्ला केला. वाघाने गाईला गंभीर जखमी करून काही अंतरापर्यंत ओढत नेले. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली, परंतु उपचारापूर्वीच गाईचा मृत्यू झाला. ही घटना दिवसाढवळ्या घडल्यामुळे स्थानिक नागरिक अधिकच धास्तावले आहेत.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाची टीम, ज्यात वनरक्षक सुनीता मकणी आणि इतर कर्मचारी होते, त्यांनी तात्काळ घटनास्थळी पाहणी केली. पाहणीदरम्यान वाघाचे स्पष्ट ठसे (पगमार्क) आढळून आले.

दिवसाढवळ्या झालेल्या या हल्ल्यामुळे नकोडा, घुग्घुस आणि आजूबाजूच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आज जनावरावर हल्ला झाला, उद्या नागरिकांवर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. वनविभागाने या परिसरात गस्त वाढवून वाघाला पकडण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
