overburden royalty waiver Chandrapur
overburden royalty waiver Chandrapur : चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वाचे असलेले पांदण रस्ते दुरुस्त करण्यासाठी, कोळसा खाणींमधून निघणाऱ्या ‘ओव्हर बर्डन’ (माती आणि दगड) वरील रॉयल्टी माफ करून ते विनामूल्य उपलब्ध करून देण्याची मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या भेटीत त्यांनी या संदर्भात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना एक पत्र दिले. या गंभीर प्रश्नावर लवकरच सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन महसूलमंत्र्यांनी दिले आहे.
लाईव्ह संगीतावर होणार दांडियाची धूम, सोमवारपासून भाऊंचा दांडिया
तर शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होणार
जिल्ह्यात कोळसा खाणींमुळे मोठ्या प्रमाणात ‘ओव्हर बर्डन’चे ढिगारे तयार झाले आहेत. यामुळे नद्यांचा नैसर्गिक प्रवाह बदलला असून, पर्यावरणाचीही मोठी हानी होत आहे. याच ‘ओव्हर बर्डन’चा उपयोग खराब झालेल्या पांदण रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी चांगल्या प्रकारे होऊ शकतो, असे खासदार धानोरकर यांनी पत्रात नमूद केले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होण्यास मदत होईल.
पत्रात, पांदण रस्त्यांच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘ओव्हर बर्डन’ वरील सर्व रॉयल्टी माफ करून ते स्थानिक प्रशासनाद्वारे शेतकऱ्यांना किंवा ग्रामपंचायतींना विनामूल्य उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. महसूलमंत्र्यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. हा निर्णय झाल्यास, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल आणि जिल्ह्याची एक मोठी पर्यावरणीय समस्या सोडवण्यासही मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.