foreign liquor illegal stock raid Chandrapur : चंद्रपूर २९ नोव्हेम्बर (News३४) : नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लागू असलेल्या दारूबंदीच्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने ब्रह्मपुरी तालुक्यात मोठी कारवाई केली आहे. दिनांक १ ते ३ डिसेंबर २०२५ या कालावधीसाठी दारूबंदी लागू असताना, मौजा उदापूर येथे ५ लाख १६ हजार रुपयांचा अवैध देशी-विदेशी दारूसाठा जप्त करण्यात आला आहे.
आदेश : चंद्रपूर जिल्ह्यातील कामगारांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी
विभागीय उपायुक्त गणेश पाटील (नागपूर विभाग) आणि अधीक्षक नितीन धार्मिक (चंद्रपूर) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गुप्त माहितीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, मौजा उदापूर, तालुका ब्रह्मपुरी येथील ज्ञानेश्वर रामकृष्ण नाकतोडे या व्यक्तीने अवैधरित्या दारूचा मोठा साठा घरात ठेवला असल्याची माहिती मिळाली होती.
शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास भरारी पथकाने आरोपीच्या घरावर छापा टाकला असता, तिथे मोठ्या प्रमाणात अवैध दारूसाठा आढळून आला. या छाप्यात विदेशी दारूच्या विविध क्षमतेच्या एकूण २२६३ बाटल्या आणि देशी दारूच्या २०० बाटल्या, असा एकूण ५ लाख १६ हजार २८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. foreign liquor illegal stock raid Chandrapur
दुय्यम निरीक्षक सोमेश्वर गव्हारे यांच्या नेतृत्वाखाली जवान सुजित चिकाटे, संजय कुमार हरिणखेडे आणि सुकेशनी कारेकार यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक सोमेश्वर गव्हारे करीत आहेत.
