False Allegations Politics : चंद्रपूर २२ डिसेंबर २०२५ (News३४ प्रकाश हांडे) – २२ डिसेंबर रोजी चंद्रपुरात अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटलचे लोकार्पण डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले, मात्र हे लोकार्पण होऊ नये यासाठी आमदार जोरगेवार यांनी जिल्हा प्रशासनाला पत्र दिल्याचा आरोप आमदार मुनगंटीवार यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे, राजकीय वैमनस्यातून हा अपप्रचार करण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया आमदार जोरगेवार यांनी दिली. (चंद्रपुरात अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटलचे उदघाटन)
चंद्रपूर येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय कॅन्सर हॉस्पिटलच्या उद्घाटन कार्यक्रमाबाबत माझ्याविषयी जाणूनबुजून अपप्रचार केला जात असून, मी सदर उद्घाटन कार्यक्रम स्थगित करण्यासाठी प्रशासनाला पत्र दिले असल्याची चुकीची माहिती पसरविली जात आहे. ही बाब पूर्णतः निराधार व दिशाभूल करणारी आहे.
परमपूज्य सरसंघचालकांच्या उपस्थितीत होणारे या महत्त्वपूर्ण रुग्णालयाचे उद्घाटन हे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यासाठी भूषणावह व अभिमानास्पद आहे. अशा पवित्र व ऐतिहासिक क्षणाबाबत कोणताही गैरसमज निर्माण होणे दुर्दैवी आहे. False Allegations Politics

खरे तर, दिनांक ९ डिसेंबर रोजी मी प्रशासनास दिलेल्या पत्रामध्ये उद्घाटन कार्यक्रम स्थगित करण्याबाबत कोणताही उल्लेख नाही. या रुग्णालयातील पाणीपुरवठा व्यवस्था, आवश्यक मनुष्यबळाची उपलब्धता तसेच मूलभूत व अत्यावश्यक सोयी-सुविधा उद्घाटनापूर्वी पूर्ण झालेल्या असाव्यात, जेणेकरून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये असा सदर पत्रामागील माझा एकमेव हेतू होता. त्या अनुषंगाने संबंधित विभागांची अति तातडीची बैठक बोलावावी, अशी सूचना या पत्राच्या माध्यमातून केली होती. चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात हे रुग्णालय असल्याने, येथील नागरिकांना अपुऱ्या सुविधांमुळे अडचणींचा सामना करावा लागू नये, हीच माझी प्रामाणिक तळमळ या पत्रामागे होती.
दुर्दैवाने, माझ्या या पत्राचा विपर्यास करून काही जण वैमनस्याच्या भावनेतून गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, वस्तुस्थिती यापेक्षा पूर्णतः भिन्न आहे. परमपूज्य सरसंघचालक हे सर्व समाजासाठी अत्यंत आदरणीय आहेत. त्यांच्या शुभहस्ते या रुग्णालयाचे उद्घाटन होणे हे आम्हा सर्वांसाठी गौरवास्पद आहे. तथापि, केवळ राजकीय आकसापोटी चुकीची माहिती पसरविणे हे ना योग्य आहे, ना लोकहिताचे. – आमदार किशोर जोरगेवार
