चंद्रपूर – Chandrapur Rain Advisory अंतर्गत कृषी विभागाने चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाचा इशारा दिला आहे. एल निनोच्या प्रभावामुळे यंदा मान्सूनमध्ये मोठा खंड पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सोयाबीन, भात, कापूस, तूर आणि ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी न करता पुरेसा पाऊस आणि जमिनीतील ओलाव्याची खात्री करूनच निर्णय घ्यावा, असे कृषी विभागाने आवाहन केले आहे. (दुय्यम निबंधक व ऑपरेटरला लाच घेताना अटक)
एल निनो च्या प्रभावामुळे मान्सूनमध्ये खंड पडणे, पावसाचे प्रमाण कमी असणे किंवा पावसाळा लवकर संपणे, अशा आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज असून यावर्षी एल निनोच्या पार्श्वभूमीवर पावसाचा मोठा खंड पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीन, भात, कापूस, तूर व ज्वारी तसेच इतर तृणधान्य व गळीतधान्य उत्पादक शेतक-यांनी कृषी तांत्रिक बाबींचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तसेच कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
Chandrapur Rain Advisory मध्ये कृषी विभागाचा इशारा
मंगळवारी चंद्रपूर जिल्हयात महसूल मंडळ निहाय ३२.५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. सदर पडलेल्या पावसाच्या आकडेवारीचे अवलोकन केले असता जिह्यातत कोणत्याही महसूल मंडळात ७५ ते १०० मिमी पावसाची नोंद झाली नाही. खरीप पिकांची पेरणी सलग दोन ते तीन दिवस किमान ७५ ते १०० मिमी पाऊस होऊन किंवा जमिनीखाली ६ इंच खोलीपर्यंत ओल झाल्याची खात्री करूनच पेरणी बाबत निर्णय घ्यावा.
अपुरा पाऊस झालेल्या स्थितीत घाईने पेरणी केल्यास उगवण व पिकांच्या वाढीवर प्रतिकुल परिणाम होण्याची शक्यता असते. सोयाबीन पिकाच्या लवकर येणा-या व कमी कालावधीच्या वाणांची बीबीएफ/सरी वरंभा/बेड पध्दतीने लागवड करावी. या पध्दतीमुळे पावसातील खंडाच्या परिस्थितीत जमिनीमध्ये आर्द्रता टिकून राहण्यास मदत होते. कापसाची लागवड सुद्धा सरी वरंभा बेडवर करावी. यामुळे पावसाचा खंड पडल्यास सरींमध्ये ओलावा टिकून राहतो आणि कमी पाऊस झाला तरी पाणी मुळांच्या कार्यकक्षेत थांबते.
शेतक-यांनी पेरणीपुर्वी घरगुती किंवा कृषी निविष्ठा केंद्रातून घेतलेल्या बियाणांची घरच्या घरी उगवण क्षमता तपासावी. यासाठी १०० बिया ओलसर कागद अथवा गोणपाटावर १० लाईनमध्ये ठेवून पाणी टाकावे. ६ ते ७ दिवस गुंडाळी करून थंड सावलीत ठेवावे. कापूस बियाणे ७० टक्के, सोयाबीन बियाणे ७० टक्के, भात बियाणे ८० टक्के व तूर बियाणे ८० टक्के बियाणे उगवल्यास पेरणी करावी.
सूक्ष्म सिंचन आणि जलसंधारणावर भर आवश्यक : उपलब्ध पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे. यासाठी शेतकऱ्यांनी ठिबक व तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करावा, ज्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळून पिकांच्या मुळांपर्यंत आवश्यक तेवढेच पाणी पोहोचवता येईल. याशिवाय, पाणी अडवा, पाणी जिरवा अंतर्गत शेततळे, सिंचन तलाव व जलसाठवण टाक्यांमध्ये पावसाचे पाणी साठवून ठेवावे. जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी व मातीची धूप रोखण्यासाठी समतल बांध, चर, कंपार्टमेंट बंडिंग यांसारखी मृद व जलसंधारणाची कामे प्राधान्याने करावीत. जमिनीतील बाष्पीभवन कमी करून ओलावा दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी पिकांचे अवशेष, सेंद्रिय पदार्थ किंवा प्लास्टिक मल्चिंगचा वापर करावा. यामुळे तणांचे प्रमाणही नियंत्रित राहते. तसेच शेणखत, कंपोस्ट, गांडूळ खत आणि हिरवळीच्या खतांचा वापर वाढवावा, ज्यामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुधारते.
महाविस्तार ॲप : जास्तीत जास्त शेतक-यांनी महाविस्तार ॲप डाउलोड करून त्यावर नोंदणी करावी. शासकीय योजना आणि सबसिडी, हवामान आणि पीक सल्ला, आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन, बाजारभाव, कृषी विभागाचे उपक्रम इत्यादी बाबींची तांत्रिक माहिती घेवून त्याचा अवलंब करावा. अधिक माहितीसाठी गावातील सहायक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालयास भेट द्यावी.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now
