चंद्रपूर (बल्लारपूर): (Ballarpur Father Murder) चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे मालमत्तेच्या वादातून मुलगा आणि सुनेने वृद्ध वडिलांवर कपडे धुण्याच्या लाकडी बॅटने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी बल्लारशाह पोलिसांनी मुलगा आणि सुनेविरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. (अनैतिक संबंधाचा संशयातून चंद्रपुरात हत्या)
मालमत्तेच्या आणि जमिनीच्या वादातून पोटच्या मुलाने आणि सुनेने मिळून वृद्ध वडिलांवर कपडे धुण्याच्या लाकडी बॅटने जीवघेणा हल्ला करून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना बल्लारपूर येथील फुलसिंग नाईक वार्डात उघडकीस आली आहे. याप्रकरणी बल्लारशाह पोलीस ठाण्यात आरोपी मुलगा राजू उपेंद्र काटीक आणि सून रवलिका राजू काटीक यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपचार सुरू असताना नागपूरच्या शासकीय रुग्णालयात (जी.एम.सी.) वृद्धाचा मृत्यू झाला. (पान टपरीवर एमडी पावडरची विक्री)
Ballarpur Father Murder : बल्लारपूरातील हत्येचे नेमके कारण काय?
या थरारक घटनेबाबत प्राप्त सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार रवींद्र उपेंद्र काटीक (वय ४५, रा. फुलसिंह नाईक वार्ड, बल्लारपूर, सध्या रा. हैदराबाद) हे तेलंगणातील हैदराबाद येथे एका कंपनीत सुरक्षा रक्षक (सिक्युरिटी गार्ड) म्हणून काम करतात. त्यांचे मूळ घर बल्लारपूर येथे असून त्यांचे वृद्ध माता-पिता तिथेच राहत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या आईचे अर्धांगवायूच्या (पॅरालिसिस) आजारामुळे निधन झाले होते. त्यांचा लहान भाऊ आरोपी राजू काटीक हा मूळचा तेलंगणातील वरंगल जिल्ह्यातील नेकुंडा येथील रहिवासी असून, तो नेहमीच आई-वडिलांशी संपत्तीच्या आणि जमिनीच्या कारणावरून वाद घालून भांडण करायचा.
दिनांक १० जून २०२६ रोजी रात्री ९ ते १० वाजताच्या सुमारास, मालमत्तेच्या याच वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले. फुलसिंह नाईक वार्डातील राहत्या घरी आरोपी राजू काटीक आणि त्याची पत्नी रवलिका काटीक या दोघांनी संगनमत करून वृद्ध वडिलांशी वाद घातला. हा वाद इतका विकोपाला गेला की, दोघांनी घरात असलेल्या कपडे धुण्याच्या लाकडी बॅटने वडिलांच्या डोक्यावर आणि शरीरावर बेदम मारहाण करत गंभीर जखमी केले. या हल्ल्यात वृद्धाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. शेजाऱ्यांनी तातडीने धाव घेत जखमी वृद्धाला प्रथम बल्लारपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.
या घटनेची माहिती बल्लारपूर येथील शेजारी आकुला गंगय्या यांनी हैदराबाद येथे असलेल्या मोठ्या मुलाला फोनवरून दिली आणि तातडीने निघण्यास सांगितले. दरम्यान, वृद्धाची प्रकृती अत्यंत चिंताजनक झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर आणि तिथून थेट नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जी.एम.सी.) हलवण्यात आले. नागपूर येथे पोहोचल्यावर मोठ्या मुलाला वडिलांच्या बोटांना निळी शाई लागलेली दिसली, ज्यामुळे मालमत्तेवर बळजबरीने अंगठा उमटवून घेण्याचा प्रयत्न केल्याचा संशय बळावला आहे.
नागपूरच्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असताना अखेर २४ जून २०२६ रोजी उपचारादरम्यान या वृद्ध पित्याची प्राणज्योत मालवली. सुरुवातीला कायदेशीर कारवाईच्या आणि पोलिसांच्या भीतीपोटी शेजाऱ्यांनी रुग्णालयात दाखल करताना ते ‘बाथरूममध्ये पाय घसरून पडले’ असा बनाव केला होता, तसेच नागपूरच्या अजनी पोलीस ठाण्यात नोंद होताना सुरुवातीला चुकीची तारीख सांगितली गेली होती. मात्र, वडिलांचे अंत्यसंस्कार आटोपल्यानंतर मोठे भाऊ रवींद्र काटीक यांनी थेट बल्लारशाह पोलीस ठाणे गाठून आपल्या लहान भावाविरुद्ध आणि सुनेविरुद्ध फिर्याद दिली.
तक्रारदार रवींद्र काटीक यांच्या तोंडी रिपोर्टवरून बल्लारशाह पोलिसांनी २६ जून २०२६ रोजी संध्याकाळी ७:१३ वाजता आरोपी राजू उपेंद्र काटीक आणि रवलिका राजू काटीक यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम १०३(१) (हत्या) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक बिपिन सुभाष इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक (सपोनी) अनिल राऊत या घटनेचा पुढील सखोल तपास करीत आहेत. या घटनेमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर परिसरात तीव्र संताप व हळहळ व्यक्त केली जात आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






