चंद्रपूर – Bhadravati Fraud Case मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे सरकारी योजनांचे काम मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका व्यावसायिकाची तब्बल १.२६ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
जिल्ह्यातील भद्रावती पोलीस ठाण्याच्या हद्दीत केंद्र व राज्य सरकारच्या विविध मोठ्या योजनांचे काम मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देऊन एका व्यावसायिकाची व त्यांच्या सहकाऱ्यांची तब्बल १ कोटी २६ लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भद्रावती येथील सुमठाणा परिसरातील रिद्धी-सिद्धी अपार्टमेंटमध्ये राहणारे आयटी सोल्यूशन व्यावसायिक ज्ञानेश्वर उद्धव देवगडे (वय ४८ वर्षे) यांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरून पोलिसांनी चिखली (बुलढाणा) येथील रहिवासी राजेश जानकीराम वाहुर्वाघ, पुणे येथील नितीन खरात, नाशिकचे शरद पाटील, बुलढाण्याचे घनश्याम मडावी आणि राजेश वाहुरवाघ यांच्यासह त्यांच्या काही सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा फसवणुकीचा प्रकार ४ जानेवारी २०२० ते २६ मे २०२३ या कालावधीत भद्रावती आणि चंद्रपूर परिसरात घडला. (चंद्रपूर बस स्थानक परिसरात चोरी करणाऱ्या महिलांना अटक)
Bhadravati Fraud Case : नेमकी फसवणूक कशी झाली?
तक्रारदार ज्ञानेश्वर देवगडे यांनी दिलेल्या प्राथमिक खबरीनुसार, २०२० मध्ये त्यांच्या एका मित्राच्या मध्यस्थीने त्यांची ओळख राजेश वाहुर्वाघ आणि नितीन खरात यांच्याशी झाली होती. आरोपींनी स्वतःचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराशी सलोख्याचे संबंध असल्याचे सांगून त्यांच्याकडे तीन राज्यांचे डेटा एंट्री व इलेक्ट्रॉनिक मीटर रिप्लेसमेंटचे काम असल्याचे भासवले. हे काम मिळवून देण्यासाठी वेंडरशिपच्या नावाखाली आरोपींनी तक्रारदाराकडून त्यांच्या ‘कैलास अँन्ड कैलास इलेक्ट्रॉनिक’, ‘जनकल्याण इकॉनॉमिक डेव्हलपमेंट निधी’ व ‘जे.ई.डी. इंटरप्रायजेस’ या कंपन्यांच्या बँक खात्यात आणि रोख स्वरूपात वेळोवेळी लाखो रुपये उकळले.
तक्रारदाराने स्वतःच्या व सहकाऱ्यांच्या माध्यमातून गोळा करून १८ लाख रुपये बँकेद्वारे तर २२ लाख रुपये मार्च २०२० मध्ये भद्रावती येथे रोख स्वरूपात दिले होते. त्यानंतर २०२१ मध्ये आरोपींनी त्यांना चिखली येथील कार्यालयात बोलावून केंद्र शासनाकडून कोरोना प्रादुर्भावाच्या काळातील आरोग्य विभागाचे मोठे काम मिळाल्याचे बनावट कागदपत्र दाखवले आणि चंद्रपूर येथे ‘पीएम जेएवाय’ व ‘वन मॅन वन नेशन’ योजनेच्या समुपदेशन केंद्राचे उद्घाटन करून तक्रारदाराचा भाचा शुभम रोंगा याची जिल्हा समुपदेशक म्हणून नियुक्ती केली. या नव्या कामाच्या आणि ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ तसेच कोविड लसीकरण मोहिमेच्या नावाखाली आरोपींनी शासनाकडून मोठा पैसा मिळणार असल्याचे सांगत पुन्हा २० लाख रुपये रोख आणि वेगवेगळ्या बँकांच्या खात्यांमधून ४४ लाख व ७ लाख रुपये असे एकूण ५१ लाख रुपये आरटीजीएसद्वारे ट्रान्सफर करून घेतले.
फसवणुकीची मालिका एवढ्यावरच थांबली नाही, तर ऑगस्ट २०२१ मध्ये आरोपींनी तक्रारदाराला दिल्लीतील एका खासदाराच्या निवासस्थानी बोलावून केंद्र सरकारच्या टीसीआयएल (TCIL) कंपनीचे सदस्य बनवण्याचे आमिष दाखवले आणि भद्रावती कार्यालयात येऊन पुन्हा १५ लाख रुपये रोख स्वरूपात घेतले. अशा प्रकारे एकूण १ कोटी २६ लाख रुपये घेऊनही कोणतेही काम न मिळाल्याने तक्रारदाराने आरोपींकडे पैशांची विचारणा सुरू केली असता आरोपींनी त्यांचे मोबाईल फोन बंद केले आणि चिखली येथील कार्यालय व घर बंद करून पळ काढला. नंतर १३ डिसेंबर २०२२ रोजी मुख्य आरोपी राजेश वाहुर्वाघ याने भद्रावती येथे येऊन तक्रारदाराला ५०-५० लाख रुपयांचे दोन धनादेश (चेक्स) दिले, परंतु बँक खात्यात पुरेशी रक्कम नसल्यामुळे ते धनादेश वारंवार बँकेतून परत आले.
आरोपींच्या पत्नीनेही पोलीस तक्रार न करण्याची गळ घालत पैसे परत करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र नंतर सर्व आरोपींनी संपर्क तोडला. आरोपींवर यापूर्वी भंडारा पोलीस ठाण्यातही अशाच प्रकारचा फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. अखेर, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ज्ञानेश्वर देवगडे यांनी २८ जून २०२६ रोजी भद्रावती पोलीस ठाण्यात लेखी तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) १८६० च्या कलम ४२०, ४६८ आणि ४७१ अन्वये गुन्हा दाखल केला असून ठाणे प्रभारी पोलीस निरीक्षक योगेश्वर विठोबा पारधी यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक वीरेंद्र देवीदास केदारे या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करीत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






