Sawali Elephant Attack नंतर व्याहाड–सोनापूर मार्गावर वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी

सावलीतील व्याहाड–सोनापूर मार्गावर रानटी हत्तीचा भीषण हल्ला; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 2, 2026

सावली : (Sawali Elephant Attack) सावली तालुक्यातील व्याहाड–सोनापूर मार्गावर रानटी हत्ती च्या हल्ल्यात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून हल्ल्याचा तपास सुरू आहे. नागरिकांनी हत्तींच्या वावराच्या भागात विशेष सतर्क राहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. (नागभीड तालुक्यात घरात शिरला बिबट्या)

सावली तालुक्यात गेल्या काही काळापासून हैदोस घालणाऱ्या रानटी हत्तींच्या कळपाने आता थेट मानवी बळी घेण्यास सुरुवात केल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील व्याहाड-सोनापूर मार्गावर हत्तीच्या हल्ल्यात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली असून, या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

Sawali Elephant Attack मध्ये नेमके काय घडले?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, व्याहाड येथील रहिवासी अतुल गोहने हे आपल्या दुचाकीने सोनापूरच्या दिशेने जात होते. याच दरम्यान व्याहाड-सोनापूर रस्त्यावर अचानक एका रानटी हत्तीने त्यांच्यासमोर दर्शन दिले. अचानक समोर आलेल्या अवाढव्य हत्तीला पाहून अतुल यांनी प्रसंगावधान राखत आपली दुचाकी तिथेच रस्त्यावर टाकली आणि जीव वाचवण्यासाठी जंगलाच्या दिशेने धाव घेतली. मात्र, आधीच बिथरलेल्या संतप्त हत्तीने त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर भीषण हल्ला केला. या हत्तीच्या हल्ल्याची तीव्रता इतकी भयानक होती की, अतुल गोहने यांचा घटनास्थळावरच करुण अंत झाला.

या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच स्थानिक नागरिकांसह वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. वनविभागाने मृतदेहाचा रीतसर पंचनामा करून तो पुढील प्रक्रियेसाठी पाठवला आहे. सावली वनपरिक्षेत्रात गेल्या अनेक आठवड्यांपासून रानटी हत्तींचा मुक्त संचार सुरू असून, आतापर्यंत हत्तींनी केवळ शेतीचे आणि पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले होते. मात्र, आता थेट मानवी जीव गेल्याने वनविभागाच्या कार्यपद्धतीवर आणि उपाययोजनांवर स्थानिक गावकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

हत्तींच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात वनविभाग अपयशी ठरत असल्याचा आरोप करत संवेदनशील भागात तातडीने सुरक्षा व्यवस्था उभारण्याची आणि नागरिकांना हत्तींच्या वावराची पूर्वकल्पना देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. दरम्यान, हा हल्ला नेमका कसा झाला आणि घटनेचा सविस्तर तपशील काय होता, याचा सखोल तपास वनविभागाच्या अधिकृत पथकाकडून केला जात असून, तपासानंतरच या घटनेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment