नागभीड : (Nagbhid Tiger Attack) अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातून एक अत्यंत थरारक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. तालुक्यातील तळोधी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सावंगी (बडगे) परिसरात एका पट्टेदार वाघाने गुराख्यावर जीवघेणा हल्ला केला.
या भीषण हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी झाला आहे. मात्र, ऐनवेळी दाखवलेले प्रसंगावधान आणि स्थानिक ग्रामस्थांच्या अभूतपूर्व धाडसामुळे गुराख्याचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात सध्या प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. (रानभाजी साठी जंगलात गेला अन जीव गमावून बसला, वाघाच्या हल्ल्यात तरुण ठार)
Nagbhid Tiger Attack: गोसेखुर्द कालव्याजवळील जंगलात भीषण घटना
तालुक्यातील तळोधी वनपरिक्षेत्रांतर्गत सावंगी (बडगे) परिसरात रविवारी दुपारच्या सुमारास वाघाने गुराख्यावर जीवघेणा हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी झाला असला, तरी प्रसंगावधान आणि ग्रामस्थांच्या धाडसामुळे त्याचा जीव वाचला. अन्यथा आणखी एका मानवी बळीची नोंद मानव-वन्यजीव संघर्षाच्या यादीत झाली असती.
जखमी गुराख्याचे नाव कांचन प्रकाश खोब्रागडे (वय ३०, रा. सावंगी-बडगे) असे आहे. रविवारी दुपारच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे स्वतःच्या म्हशी आणि बैलांना चराईसाठी जंगल परिसरात घेऊन गेले होते. गोसेखुर्द कालव्याजवळील जंगलात ते पोहोचताच झुडपात दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने अचानक त्यांच्यावर झडप घातली. वाघाने त्यांच्या शरीराला जबड्यात पकडून फरफटत नेण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
मात्र अत्यंत धैर्य दाखवत कांचन खोब्रागडे यांनी वाघाच्या तावडीतून स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न केला आणि मोठ्याने आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकताच जवळच असलेले रवी वाडगुरे तातडीने घटनास्थळी धावून आले. त्यांच्या उपस्थितीमुळे वाघाने माघार घेतल्याचे सांगितले जात असून, जखमी गुराख्याला सुरक्षितपणे गावात आणण्यात आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी जखमी कांचन खोब्रागडे यांना तातडीने तळोधी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि पुढील उपचारांसाठी त्यांना सिंदेवाही येथे हलविण्यात आले. तेथील प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारासाठी त्यांना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, सावंगी (बडगे) आणि आसपासच्या जंगल परिसरात यापूर्वीही वाघांच्या हल्ल्यांच्या अनेक घटना घडल्या आहेत. विशेषतः गुरेढोरे ठार होण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांमध्ये आधीपासूनच भीतीचे वातावरण आहे. आजच्या घटनेनंतर ही भीती आणखी वाढली असून शेतकरी, गुराखी आणि जंगलालगत राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यासह परिसरात वाढत चाललेल्या मानव-वन्यजीव संघर्षाने चिंताजनक स्वरूप धारण केले आहे. आतापर्यंत या संघर्षात २४ जणांचा मृत्यू झाला असून अनेक नागरिक जखमी झाले आहेत. अशा पार्श्वभूमीवर कांचन खोब्रागडे यांचे नशीब बलवत्तर ठरले. वाघाच्या थेट हल्ल्यातून ते जीव वाचवण्यात यशस्वी झाले, ही बाब दिलासादायक असली तरी वन्यजीवांच्या वाढत्या वावरामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी संबंधित वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. तसेच जंगलालगतच्या गावांमध्ये गस्त वाढविणे, वाघाच्या हालचालींवर सातत्याने नजर ठेवणे आणि नागरिकांना वेळोवेळी सतर्कतेच्या सूचना देण्याची मागणीही करण्यात येत आहे. वनविभागाने परिसरात पाहणी सुरू केली असून वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






