चंद्रपूर – (Chandrapur Development News) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि सर्वसमावेशक शिक्षण मिळणे ही काळाची गरज आहे. चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील मोरवा येथे दीड कोटी रुपयांच्या निधीतून नव्याने तयार करण्यात आलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे लोकार्पण आज आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आले. या नवीन वास्तूमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि सुसज्ज शैक्षणिक वातावरण उपलब्ध होणार आहे. (चंद्रपुरात कांग्रेसचे रघुपति राघव राजाराम आंदोलन)
Chandrapur Development News : ग्रामीण शिक्षणाचा दर्जा सुधारणार
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि सर्वसमावेशक शिक्षण मिळणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक मुलाला गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शाळांमध्ये आवश्यक सुविधा निर्माण करणे, शिक्षकांची कमतरता दूर करणे आणि पालकांनी मुलांना नियमितपणे शाळेत पाठविणे आवश्यक आहे. शाळेची पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी सामूहिक प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे हे आपले सामूहिक कर्तव्य आहे, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
दीड कोटी रुपयांच्या निधीतून मोरवा येथे नव्याने तयार करण्यात आलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे लोकार्पण आज आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला गट शिक्षण अधिकारी संदिप यादव, विस्तार अधिकारी सुनिल मुत्यलवार, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता बारहाते, उपशिक्षण अधिकारी पांडुरंग कोटेकर, मोरवा सरपंच स्नेहा साव, उपसरपंच भुषण पिदुरकर, मुख्याध्यापक शंकर आश्राम, बलराम डोडाणी, ग्रामीण युवा मोर्चा अध्यक्ष आशिष वाढई, नकुल वासमवार, सचिन साव, प्रविण सिंग, दुर्गा बावणे, दयानंद नागरकर, प्रेम गंगाधरे, आदि मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि, शाळेतील पटसंख्या वाढविण्यासाठी सर्वांनी सकारात्मक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्याला उत्तम दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शाळांमध्ये शैक्षणिक सुविधा, अभ्यासासाठी पोषक वातावरण आणि गुणवत्तापूर्ण अध्यापन उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, अनेक शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होतो. ही बाब लक्षात घेऊन कंत्राटी पद्धतीवर शिक्षक उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. विद्यार्थ्यांना नियमित अध्यापन मिळावे, त्यांचा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण व्हावा आणि शिक्षणाची गुणवत्ता अबाधित राहावी यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
नवीन शाळा इमारतीमुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित, सुसज्ज आणि अभ्यासासाठी अनुकूल वातावरण मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलांना मोठ्या संधी उपलब्ध होतील आणि त्यांचे भविष्य अधिक उज्ज्वल होईल, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनीही शाळेच्या विकासासाठी आवश्यक सहकार्य करण्याची ग्वाही दिली. तसेच विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण, चांगले संस्कार आणि गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन मिळावे यासाठी पालकांनी शाळेशी सातत्याने संपर्क ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळीग्रामस्थ, पालक, विद्यार्थी, शिक्षक तसेच विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
मोरवा येथील समाज भवनाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते लोकार्पण
मोरवा येथे नव्याने बांधण्यात आलेल्या समाज भवनाचे लोकार्पण आज सोमवारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ, स्थानिक नागरिक आणि विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी समाज भवन हे गावातील सामाजिक, सांस्कृतिक आणि सामुदायिक उपक्रमांसाठी उपयुक्त ठरेल, असे सांगितले. या भवनामुळे ग्रामस्थांना विविध कार्यक्रमांसाठी एक सुसज्ज व सोयीस्कर व्यासपीठ उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी समाज भवनात राहिलेल्या अनुषंगिक कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले. ग्रामस्थांनी समाज भवनाच्या लोकार्पणाबद्दल समाधान व्यक्त करत आमदार किशोर जोरगेवार यांचे आभार मानले.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






