चारा टंचाई नियोजन आढावा बैठकीत जिल्हाधिकारी वसुमना पंत मार्गदर्शन करताना

चारा टंचाई नियोजन: हार्वेस्टरऐवजी मनुष्यबळाने धान कापणीस प्राधान्य द्या, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 6, 2026

चंद्रपूर –  चारा टंचाई नियोजन आतापासूनच करणे आवश्यक असल्याचे निर्देश जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिले. दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. धान कापणीनंतर उपलब्ध होणारे तणीस वाया जाऊ नये, असे त्यांनी सांगितले. त्यासाठी हार्वेस्टरऐवजी मनुष्यबळाद्वारे कापणीस प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले. कडबाकुट्टी यंत्रांचा वापर आणि हायड्रोपोनिक पद्धतीने मका चारा निर्मितीलाही प्रोत्साहन देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. (वेकोलि कार्यालयात चाकू हल्ला, आरोपीला अटक)

चारा टंचाई नियोजन: जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रमुख सूचना

जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात जनावरांना चाऱ्याची टंचाई भासू नये, यासाठी आतापासूनच व्यापक आणि प्रभावी नियोजन करणे आवश्यक आहे. विशेषतः धान कापणीनंतर उपलब्ध होणारे तणीस वाया जाणार नाही, याची दक्षता घेऊन त्याचा जनावरांच्या चाऱ्यासाठी जास्तीत जास्त उपयोग करावा. यासाठी शेतकऱ्यांनी हार्वेस्टर यंत्राऐवजी शक्यतो मनुष्यबळाद्वारे धानाची कापणी करण्यास प्राधान्य द्यावे. तसेच चारा उत्पादन, संवर्धन आणि साठवणुकीसाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिले.

जिल्ह्यातील संभाव्य चारा टंचाईच्या अनुषंगाने चारा उत्पादन व व्यवस्थापनाच्या नियोजनाबाबत आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, उपजिल्हाधिकारी संजय पवार, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुरेश कुंभरे, मृद व जलसंधारण अधिकारी नीलिमा मंडपे, विभागीय वन अधिकारी राजन तलमले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पाच गावांत प्रायोगिक जनजागृती

जिल्हाधिकारी वसुमना पंत म्हणाल्या की, हार्वेस्टर यंत्राद्वारे धानाची कापणी केल्यास मोठ्या प्रमाणात तणीस शेतातच राहते किंवा त्याचा चाऱ्यासाठी पुरेसा उपयोग होत नाही. मात्र मनुष्यबळाद्वारे कापणी केल्यास तणीस व्यवस्थित गोळा करून जनावरांसाठी चारा म्हणून वापरता येते. त्यामुळे शेतकऱ्यांना दोन्ही पद्धतींमधील फरक प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे समजावून सांगावा.

यासाठी प्रायोगिक तत्त्वावर पाच गावांची निवड करून जनजागृती उपक्रम राबवावेत. त्यानंतर प्रत्येक तालुक्यातील किमान दहा गावांमध्ये कृषी, पशुसंवर्धन, महसूल, ग्रामविकास व वन विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे शेतकरी व पशुपालकांना मार्गदर्शन करावे.

पुढे त्या म्हणाल्या, उपलब्ध चाऱ्याचा अपव्यय टाळण्यासाठी कडबाकुट्टी यंत्रांचा अधिकाधिक वापर करण्यावर भर द्यावा. विदर्भ-मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पांतर्गत जास्तीत जास्त शेतकरी व पशुपालकांना विद्युतचलित कडबाकुट्टी यंत्रांचा लाभ मिळवून द्यावा.

कमी पाण्यात चारा उत्पादनासाठी हायड्रोपोनिक पद्धतीने मका चारा निर्मितीला प्रोत्साहन द्यावे. विशेषतः पाण्याची मर्यादित उपलब्धता असलेल्या पशुपालकांना या तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवून त्याचे फायदे समजावून सांगावेत. आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि दृकश्राव्य माध्यमांच्या साहाय्याने चारा उत्पादनाबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment