चंद्रपूर येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या कार्यशाळेत उपस्थित अधिकारी, चंद्रपूर चारा लागवड

चंद्रपुरात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची कार्यशाळा; दुष्काळ निवारणासाठी चारा लागवड व जलसंधारणावर भर

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 17, 2026

चंद्रपूर, दिनांक १७ नोव्हेंबर: चंद्रपूर चारा लागवड आणि दुष्काळ निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने एकात्मिक नियोजनावर भर दिला आहे. पाणी, शेती आणि पशुधन यांचा समन्वय साधून जलसंधारण, चारा उत्पादन आणि रोजगारनिर्मितीची कामे राबविण्याचे आवाहन करण्यात आले. जिल्हा परिषद चंद्रपूरच्या वतीने प्रियदर्शिनी सभागृहात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२६-२७ अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा आणि पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह उपस्थित होते. (जिल्हा न्यायालयातील कर्मचारी संपावर, वाचा बातमी)

चंद्रपूरमध्ये दुष्काळ निवारणासाठी पाणी आणि पीक नियोजनावर भर, चंद्रपूर चारा लागवड

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी पाणी, शेती आणि पशुधन यांचे एकात्मिक नियोजन करणे अत्यंत आवश्यक असून, जलसंधारण, चारा उत्पादन, पीक नियोजन व रोजगारनिर्मितीच्या कामांना प्राधान्य देऊन विविध शासकीय योजनांच्या अभिसरणातून गावांचा सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्हा परिषद चंद्रपूरच्या वतीने प्रियदर्शिनी सभागृह येथे ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा व पुरस्कार वितरण सोहळा’ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमादरम्यान दुष्काळ निवारण चर्चासत्र तसेच चारा लागवड व पीक नियोजन कार्यशाळा देखील आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी वसुमना पंत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह प्रामुख्याने उपस्थित होते.

५०२ तलावांच्या परिसरात (चंद्रपूर )चारा लागवडीचे नियोजन

जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गावपातळीवर पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, जलस्रोतांची स्थिती, जलसंधारणाची कामे आणि रब्बी हंगामातील पीक नियोजन याबाबत पूर्वतयारी करण्याच्या सक्त सूचना या कार्यशाळेत देण्यात आल्या. उपलब्ध पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करून शेती व पशुधनासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबव्यात, तसेच प्रत्येक गटविकास अधिकारी व संबंधित विभागप्रमुखांनी आपल्या कार्यक्षेत्रातील परिस्थितीचा नियमित आढावा घ्यावा, असे मार्गदर्शनात स्पष्ट करण्यात आले. संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यात चारा उत्पादन वाढविण्यावर विशेष भर देण्यात येत असून, शासनाच्या ६ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या निर्णयानुसार गायरान तसेच वैयक्तिक जमिनीवर चारा लागवडीच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यातील ५०२ तलावांच्या परिसरात चारा लागवडीचे नियोजन करण्यात आले असून, जिल्हा वार्षिक योजना व विदर्भ-मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे ३.५७ लाख मेट्रिक टन चारा उत्पादनाचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

या अनुषंगाने ज्वारी, मका, बाजरी, नेपियर गवत आदी चारा पिकांच्या लागवडीसह मुरघास निर्मिती, कडबा कुट्टी आणि अझोला उत्पादनास व्यापक प्रोत्साहन देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, चारा उत्पादनाच्या या कामांमध्ये महिला बचत गटांचा सहभाग वाढवून ग्रामीण भागात रोजगार व उत्पन्नाच्या नवीन संधी निर्माण करण्यावरही विशेष भर देण्यात आला आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२६-२७ हे केवळ पुरस्कार मिळविण्यापुरते मर्यादित नसून गावकऱ्यांच्या सामाजिक, आर्थिक व पर्यावरणीय विकासाची ही एक महत्त्वपूर्ण संधी आहे.

या अभियानांतर्गत सुशासनयुक्त पंचायत, सक्षम पंचायत, जलसमृद्ध गाव, स्वच्छ व हरित गाव, योजनांचे अभिसरण, संस्था बळकटीकरण, उपजीविका विकास, सामाजिक न्याय तसेच लोकसहभाग व श्रमदान या आठ प्रमुख घटकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या अभियानाचा कालावधी ३१ मार्च २०२७ पर्यंत असल्याने प्रत्येक ग्रामपंचायतीने गावातील उपलब्ध साधनसंपत्ती, अपूर्ण विकासकामे आणि नागरिकांच्या गरजांचा सांगोपांग विचार करून ग्रामपंचायतनिहाय ठोस कृती आराखडा तयार करावा आणि ग्रामपंचायत ही गावाच्या विकासाचे नेतृत्व करणारी सक्षम संस्था बनली पाहिजे, असे निर्देश देण्यात आले.

योजनांच्या अभिसरणातून रोजगार व उपजीविकेला चालना देताना रोजगार हमी योजनेतून जलसंधारणाची कामे करून निर्माण झालेल्या जलसाठ्याचा उपयोग चारा लागवडीसाठी करावा, ज्यामुळे चारा उपलब्धतेमुळे पशुपालन व दुग्धव्यवसायाला मोठी चालना मिळेल. त्याचबरोबर महिला बचत गटांच्या माध्यमातून विविध प्रक्रिया उद्योग व रोजगारनिर्मितीच्या संधी उपलब्ध होऊन जलसंधारण, चारा उत्पादन, पशुसंवर्धन आणि उपजीविका विकासाची कामे एकत्रितपणे साध्य करता येतील. यासाठी ग्रामपंचायत, कृषी, पशुसंवर्धन, रोजगार हमी, मृद व जलसंधारण तसेच महिला व बालविकास विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून पंचायत समिती स्तरावर नियमित आढावा घेत अंमलबजावणीतील अडचणी तातडीने दूर कराव्यात.

दरम्यान, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सन २०२५-२६ अंतर्गत जिल्हास्तरावर उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या ग्रामपंचायत चिंतलबधाबा, सागरा आणि जिबगाव या तीन ग्रामपंचायतींना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. या कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) मीना साळुंखे, नूतन सावंत, उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक गिरीश धायगुडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, गटविकास अधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी तसेच कृषी व पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment