चंद्रपूर: नशामुक्त भारत स्पर्धा चंद्रपुरात ‘राष्ट्र शौर्य समृद्धी’ उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आली आहे. आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली निबंध आणि घोषवाक्य अशा दोन गटांत ही स्पर्धा होणार आहे. आयोजकांच्या माहितीनुसार, स्पर्धा मराठी आणि हिंदी भाषांत खुली आहे. निबंध स्पर्धेतील २० उल्लेखनीय स्पर्धकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चहापान आणि संवादाची संधी मिळणार आहे. (चंद्रपुरातील गॅस वितरण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह, वाचा सविस्तर)
व्यसनमुक्त आणि नशामुक्त भारताच्या संकल्पनेला अधिक बळ मिळावे, या उद्देशाने आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपुरात ‘राष्ट्र शौर्य समृद्धी’ उपक्रमांतर्गत निबंध व घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘नशामुक्त भारत’ हा या स्पर्धेचा मुख्य विषय असून, स्पर्धकांना मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये आपले विचार मांडण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नशामुक्त भारत स्पर्धा: उपक्रमाचा उद्देश काय?
विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत व्यापक जनजागृती निर्माण करणे, व्यसनांचे होणारे दुष्परिणाम समाजासमोर प्रभावीपणे मांडणे आणि युवा पिढीला व्यसनांपासून दूर राहण्याचा सकारात्मक संदेश देणे, हा या स्पर्धेमागचा प्रमुख हेतू आहे. विशेष म्हणजे, निबंध स्पर्धेतील २० उल्लेखनीय स्पर्धकांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चहापान तसेच संवाद साधण्याची सुवर्णसंधी मिळणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
या स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसांची योजना आखण्यात आली आहे. निबंध स्पर्धेत प्रथम पारितोषिक म्हणून बजाज कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर, द्वितीय क्रमांकासाठी लॅपटॉप आणि तृतीय क्रमांकासाठी सॅमसंग टॅबलेट देण्यात येणार आहे. याशिवाय चौथ्या क्रमांकाच्या तीन विजेत्यांना सायकल, पाचव्या क्रमांकाच्या दहा विजेत्यांना स्मार्ट वॉच, तर सहाव्या क्रमांकाच्या १०० विजेत्यांना टिफिन बॉक्स आणि पाणी बॉटल अशी बक्षिसे दिली जातील.
घोषवाक्य स्पर्धेतील विजेत्यांसाठीही पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये प्रथम क्रमांकासाठी १० हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ७ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ५ हजार रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. तसेच चौथ्या क्रमांकाच्या तीन विजेत्यांना सायकल, तर पाचव्या क्रमांकाच्या १०० विजेत्यांना टिफिन बॉक्स व पाणी बॉटल प्रदान करण्यात येणार आहे.
स्पर्धेच्या पात्रतेनुसार, निबंध स्पर्धा इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुली असून निबंध ३०० शब्दांच्या मर्यादेत लिहिणे आवश्यक आहे. तर घोषवाक्य स्पर्धेत पदवीच्या प्रथम वर्षापासून ते पदव्युत्तर अंतिम वर्षापर्यंतचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. घोषवाक्य मराठी किंवा हिंदी भाषेत लिहिता येईल.
स्पर्धेच्या उत्तरपत्रिकांचे वितरण २३ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२६ या कालावधीत केले जाणार असून, पूर्ण भरलेल्या उत्तरपत्रिका ४ ते १० डिसेंबर २०२६ दरम्यान जमा करायच्या आहेत. या स्पर्धेचा निकाल आणि पारितोषिक वितरण सोहळा रविवार, २१ डिसेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता चंद्रपूर येथील महानगरपालिका मैदान, गांधी चौक येथे पार पडणार आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून नशामुक्त भारताच्या चळवळीत आपले योगदान द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






