चंद्रपूर : Drain Inspection Chandrapur मोहिमेअंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त अकुनुरी नरेश यांनी शहरातील प्रमुख नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी करून पावसाळ्यापूर्वी आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेतला. नाल्यांमधील गाळ, कचरा आणि अडथळे दूर करून पाण्याचा निचरा सुरळीत ठेवण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच रस्ते बांधकाम आणि लहान नाल्यांच्या कामांची गुणवत्ता तपासून नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला. (नागरिकांनी मनपाला दिला ७ दिवसांचा अल्टिमेटम)
Drain Inspection Chandrapur पावसाळ्यापूर्वी नाल्यांची पाहणी
पाहणीदरम्यान आयुक्तांनी नाल्यांमधील गाळ, कचरा, अतिक्रमणे तसेच पाण्याच्या प्रवाहास अडथळा निर्माण करणाऱ्या बाबींची सविस्तर माहिती घेतली. विशेषतः पुलाखालील व अरुंद भागांमध्ये पाण्याचा प्रवाह सुरळीत राहण्यासाठी आवश्यक ती साफसफाई व गाळ उपसा तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तसेच शहरातील विविध प्रभागांमध्ये सुरू असलेल्या रस्ते बांधकाम कामांची तसेच लहान नाल्यांच्या बांधकाम व दुरुस्ती कामांचीही प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी कामांची गुणवत्ता, प्रगती व निर्धारित कालावधीत कामे पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकारी व कंत्राटदारांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विकासकामे नियोजनबद्ध व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
पावसाळ्यात शहरातील कोणत्याही भागात पाणी साचू नये, नागरिकांना पूरस्थितीचा सामना करावा लागू नये आणि संभाव्य आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. नाल्यांच्या नियमित स्वच्छतेसह संवेदनशील ठिकाणांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना देखील यावेळी देण्यात आल्या.
महानगरपालिका प्रशासनाकडून पावसाळ्यापूर्वीची सर्व तयारी वेळेत पूर्ण करण्यात येत असून नागरिकांनीही नाल्यांमध्ये कचरा टाकू नये व स्वच्छता राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले. या पाहणी दौऱ्यात सहाय्यक आयुक्त श्री. सचिन माकोडे, शहर अभियंता श्री. रवींद्र हजारे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते