Chandrapur Dengue Alert dry day campaign by municipal corporation

फ्रिज आणि एसीचे पाणी त्वरित करा रिकामे; चंद्रपूर मनपाचे जाहीर आवाहन पहा

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 13, 2026

चंद्रपूर – (Chandrapur Dengue Alert) मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता पाहता, पावसाळ्यात शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून चंद्रपूर शहर महानगरपालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. डेंग्यू डासांची उत्पत्ती टाळण्यासाठी नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ म्हणून पाळावा, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे. एडीस इजिप्ती डासांची पैदास रोखण्यासाठी गृहनिर्माण सोसायट्या आणि रहिवाशांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. (मतदार यादी पुनर्निरीक्षण, चंद्रपूर मोहीम थन्डबस्त्यात)

Chandrapur Dengue Alert : स्वच्छ पाण्यात अंडी घालतो एडीस डास

यंदा जुलैच्या मध्यान्हापर्यंत अपेक्षित पावसाला सुरुवात झाली नसली तरी,भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता पाहता, पावसाने आपल्या परीसरात डेंग्युचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी डेंग्यु डासाची उत्पत्ती टाळणे आवश्यक आहे याकरीता आठवड्यातून एक दिवस हा कोरडा दिवस म्हणुन पाळण्याचे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.


   डेंग्यू रोगास कारणीभूत असणारी एडीस ही मादी डास ही जमिनीपासून १०० मीटर पर्यंत उडू शकते त्यामुळे आपण आपल्या घराचा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे.  डेंग्यू रोगाचा डास हा स्वच्छ पाणी व काही दिवस साठवलेल्या पाण्यात फोफावणारा असल्याने आठवड्यातून एकदा तरी पाण्याची भांडी रिकामी करून घासून पुसून स्वच्छ करून ठेवावीत तसेच पाणी भरलेली भांडी घट्ट झाकून ठेवावीत. घर व परीसरातील पाणी साठ्यात डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घेतल्यास आपण व आपल्या कुटुंबियांना याचा निश्चितच फायदा होईल.  


   डासांमुळे पसरणाऱ्या आजारांमध्ये डेंग्यूताप व डेंग्यू रक्तस्रावी ताप हे मुख्य आजार आहेत. ताप येणे, अंगावर पुरळ येणे, डोळ्याच्या खोबणीमधे दुखणे, पाठदुखी, डोकेदुखी, स्नायूमध्ये वेदना, सांधेदुखी ही डेंग्यूची  प्रमुख लक्षणे आहेत. वस्तुतः डेंग्यू हा सामान्य आजार आहे परंतु अनेकदा अपुरी माहिती असल्याने काही वेळा तो जीवघेणा ठरू शकतो. म्हणून प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. डेंग्यू विषाणूजन्य व नोटीफायेबल असल्याने म्हणजेच कुठल्याही खाजगी व शासकीय डॉक्टर्सना असा संशयित रुग्ण आढळल्यास  त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  त्याची माहिती महानगरपालिकेस कळविणे अनिवार्य आहे.


   नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, जास्त दिवस पाणी साठू न देता डासांची उत्पत्ती टाळावी. शहर डेंग्युमुक्त करण्याच्या मनपाच्या प्रयत्नांना नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.  

 आपल्या परीसरात डेंग्युचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पुढील गोष्टी अवश्य करा –

  • १. डेंग्यूचा मच्छर हा स्वच्छ पाण्यात अंडी देणारा असतो त्यामुळे स्वच्छ पाणी साठवून ठेऊ नका.
  • २. घरी असलेल्या फ्रिजची टॅंक हमखास साफ करा.
  • ३. एकदा भरलेले कुठलेही पाणी सात दिवसापर्यंत साठवून ठेवण्यात येऊ नये.
  • ४. पिण्याच्या पाण्याचा परिसर स्वच्छ ठेवणे व पाणी अशुध्द होऊ नये याची काळजी घ्या.
  • ५. परिसरात कचरा साठू देऊ नका.  
  • ६. डास अळी आढळणारी पाण्याची भांडी रिकामी करा.
  • ७. सोसायटी मधे राहणाऱ्या रहिवाश्यांनी जमिनीखालील व जमिनीवरील टाक्या स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे.
  • ८. एसी मधुन निघणारे पाणी नियमित खाली करणे
  • ९. कुंड्यांच्या खालच्या प्लेट मधले पाणी रिकामे करणे
  • १०. आठवड्यातून एक दिवस सर्व पाण्याची भांडी रिकामी करून कोरडा दिवस पाळून स्वतःचे व कुटूंबाचे आरोग्य रक्षण करा ,सतर्क राहुन स्वतःची काळजी घ्या. 


     

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment