Chandrapur Fuel Protest । जनतेच्या खिश्यावर सरकार टाकतंय दरोडा – खासदार प्रतिभा धानोरकर

Chandrapur Fuel Protest : चंद्रपूर : “गेल्या अवघ्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात साडेसात रुपयांची प्रचंड वाढ करून या सरकारने सामान्य जनतेच्या खिशावर दिवसाढवळ्या दरोडा टाकला आहे. लोकांचे पगार वाढत नाहीयेत, पण इंधनाचा खर्च मात्र दुप्पट झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील युद्धाचे खोटे कारण पुढे करून सर्वसामान्यांचे रक्त शोषण्याचे काम हे सरकार करत असून, जोपर्यंत ही अन्यायकारक दरवाढ मागे घेतली जात नाही, तोपर्यंत काँग्रेसचा हा जनआक्रोश शांत होणार नाही,” असा तीव्र इशारा खासदार pratibha dhanorkar यांनी दिला. (इंधन दरवाढीविरोधात राजुरा शहरात कांग्रेसचे आंदोलन)

Chandrapur Fuel Protest मुळे चंद्रपूरमध्ये काँग्रेस आक्रमक

चंद्रपूर शहर व ग्रामीण congress कमिटीच्या वतीने आज, २९ मे रोजी सकाळी ९:०० वाजता जनता कॉलेज जवळील कोतपल्लीवार पेट्रोल पंप येथे सरकारच्या अन्यायकारक पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात भव्य जनआंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व करताना खासदार pratibha dhanorkar यांनी सत्ताधाऱ्यांच्या हुकूमशाही आणि शेतकरी-सर्वसामान्य विरोधी धोरणांवर कडाडून प्रहार केला. यावेळी पेट्रोल पंपावर येणाऱ्या वाहनधारकांना खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते ‘मेलोडी’ चॉकलेट देऊन केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा आणि इव्हेंटबाजीचा उपरोधिकपणे निषेध करण्यात आला.

यावेळी माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, शहर जिल्हाध्यक्ष शिवा राव पोलिशेट्टी, काँग्रेस माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, जेष्ठ congress नेते अंबिकाप्रसाद दवे, महिला जिल्हाध्यक्ष कुंदा जेणेकर, शहर महिला जिल्हाध्यक्ष चंदा वैरागडे यांच्यासह माजी शहर जिल्हाध्यक्ष, पक्षाचे सर्व सन्माननीय नगरसेवक, ज्येष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खासदार pratibha dhanorkar यांनी भाषणात इंधन दरवाढीचे आकडे मांडत सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली. त्या म्हणाल्या, “१५ मे रोजी एका फटक्यात ३ रुपये वाढवले, त्यानंतर १९ आणि २३ मे रोजी पुन्हा ९०-९० पैशांची छुपी लूट केली. २५ मे रोजी तर पेट्रोल २ रुपये ६१ पैसे आणि डिझेल २ रुपये ७१ पैशांनी महाग केले. अवघ्या काही दिवसांत साडेसात रुपयांची ही वाढ मध्यमवर्गीयांचे बजेट कोलमडवून टाकणारी आहे. घराचे रेशन भरावे की गाडीत पेट्रोल टाकावे, अशी भयंकर परिस्थिती आज निर्माण झाली आहे. डिझेलच्या दरवाढीमुळे मालवाहू ट्रकचा वाहतूक खर्च प्रचंड वाढला असून त्याचा थेट फटका सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराला बसला आहे. आज भाजीपाला, दूध, फळे, धान्य या प्रत्येक जीवनावश्यक वस्तूचे भाव गगनाला भिडले असून गरिबांनी जगावे कसे, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.”

यावेळी बोलताना माजी आमदार तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले की, “शेतीचा हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्याचे ट्रॅक्टर, पाण्याचे पंप आणि कापणी यंत्रासाठी लागणारे डिझेल आज सोन्याच्या भावाने विकले जात आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मागणीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ३० लीटर डिझेल देण्याची मागणी मंजूर केली असली, तरी इंधनाचा हाहाकार पाहता हे अत्यंत अपुरे आहे. शेतकऱ्याचा खर्च दुप्पट आणि उत्पन्न निम्मे करण्याचे पाप या सरकारने केले आहे. विरोधी पक्षात असताना पेट्रोलचे भाव दोन पैशांनी वाढले तरी गळ्यात महागाईचे हार घालून रस्त्यावर उतरणारे, बैलगाड्या ओढणारे आजचे सत्ताधारी नेते आता सत्तेच्या उबदार खुर्च्यांवर बसून गप्प का आहेत? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एका दिवसाच्या फोटोसेशनसाठी बुलेटने फिरतात, तर दोन्ही उपमुख्यमंत्री कोट्यवधींच्या महागड्या ईव्ही गाड्या घेऊन मिरवत आहेत. सरकारचे काम जनतेला दिलासा देणे असते, स्वतःच्या प्रसिद्धीचे इव्हेंट करणे नाही. तुम्ही जनतेचे कैवारी आहात की तिजोरी भरणारे व्यापारी आहात, हे एकदा महाराष्ट्राला स्पष्ट करून सांगा.”

महिला जिल्हाध्यक्ष कुंदा जेणेकर यांनी आपल्या भाषणात पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यावर आणि सोशल मीडियावरील ‘मेलोडी’ व्हिडिओवर तीव्र आक्षेप घेतला. त्या म्हणाल्या की, “देशातील जनतेला ‘बचत करा’ असा सल्ला देणारे प्रधानमंत्री स्वतः मात्र देशातील इंधनाचा हाहाकार वाऱ्यावर सोडून करोडो रुपयांचा सरकारी खर्च करून परदेशात फिरत आहेत. इटलीच्या मैत्रिणीसोबत ‘मेलोडी’ चॉकलेटचे व्हिडिओ बनवून ते १०० कोटी देशवासीयांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. एकेकाळी जगात भयंकर आर्थिक मंदीचे सावट असताना डॉ. मनमोहन सिंग यांनी आपल्या विद्वत्तेच्या जोरावर देशाला सावरले होते. ते विद्वान होते, कमी बोलायचे पण काम चोख करायचे. परंतु आज देशावर संकट असताना आपले प्रधानमंत्री देशाला वाऱ्यावर सोडून फिरत आहेत, ही अत्यंत खेदाची बाब आहे.”

आंदोलनाच्या शेवटी काँग्रेस नेत्यांनी सरकारला ठणकावून सांगितले की, “ही तर फक्त आंदोलनाची सुरुवात आहे. जर सामान्य जनता आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही आणि ही अन्यायकारक दरवाढ मागे घेतली नाही, तर येणाऱ्या काळात याहून तीव्र संघर्ष केला जाईल.”

Leave a Comment