Cooler Safety Chandrapur : चंद्रपूर: सध्या उन्हाचा पारा वाढल्यामुळे उकाड्यापासून सुटका मिळवण्यासाठी घराघरांमध्ये कुलरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. कुलरचा हा गारवा जरी सुखावह वाटत असला, तरी किरकोळ निष्काळजीपणामुळे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. अलीकडेच नागपूर येथील एका इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरचा आणि चंद्रपूरच्या इंदिरानगर येथील मांडवे कुटुंबातील बाप-लेकाचा चालू कुलरमध्ये पाणी भरताना विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर, नागरिकांचा उन्हाळा सुरक्षित जावा यासाठी महावितरण ने काही अत्यंत महत्त्वाचे सुरक्षेचे नियम जाहीर केले आहेत. (चंद्रपुरात कुलरमुळे बाप-लेकाचा मृत्यू)
महावितरणने दिलेल्या माहितीनुसार, जर कुलरमध्ये तांत्रिक बिघाड असेल आणि घराची ‘अर्थिंग’ (Earthing) योग्य नसेल, तर Coolerच्या लोखंडी बॉडीमध्ये विजेचा प्रवाह उतरतो. अशा वेळी ओल्या हाताने किंवा अनवाणी पायाने कुलरला स्पर्श केल्यास तीव्र शॉक बसू शकतो. त्यामुळे थोडीशी सतर्कता बाळगून खालील नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Cooler Safety Chandrapur: कुलर वापरताना घ्यायची काळजी
🔌 सुरक्षित गारव्यासाठी महत्त्वाचे नियम:
- पाणी भरताना सावधानता: Cooler मध्ये पाणी भरण्यापूर्वी मुख्य स्विच (Main Switch) बंद करून प्लग पूर्णपणे बाहेर काढावा. चालू कुलरमध्ये कधीही पाणी भरू नये.
- ‘आयएसआय’ (ISI) मार्कचाच वापर: बाजारातून कुलर खरेदी करताना नेहमी आयएसआय मार्क असलेला दर्जेदार कुलरच खरेदी करा.
- तज्ज्ञांकडून तपासणी: उन्हाळ्यात कुलर पहिल्यांदा सुरू करण्यापूर्वी अधिकृत इलेक्ट्रिशियनकडून त्याची आणि घराच्या अर्थिंगची व्यवस्थित तपासणी करून घ्यावी.
- ओल्या हातांनी स्पर्श टाळा: हात किंवा पाय ओले असताना कोणत्याही विद्युत उपकरणाला अथवा स्विचला स्पर्श करू नये.
- स्वतंत्र पॉवर सॉकेट: कुलरसाठी नेहमी स्वतंत्र पॉवर सॉकेट वापरावे. एकाच सॉकेटवर मल्टिप्लग वापरून अनेक मोठी उपकरणे जोडू नयेत.
- महिला व लहान मुलांची काळजी: घरातील लहान मुलांना कुलरपासून सुरक्षित अंतरावर ठेवावे. तसेच महिलांनीही घरकाम करताना ओल्या हाताने Cooler हाताळू नये.
- त्वरित दुरुस्ती: कुलरमधून विचित्र आवाज येत असल्यास किंवा वायर कट झाली असल्यास त्वरित तज्ज्ञांकडून तो दुरुस्त करून घ्यावा.
🚨 शॉक बसल्यास काय करावे?
दुर्दैवाने एखाद्या व्यक्तीला विजेचा धक्का लागल्यास, त्याला थेट स्पर्श करू नये. त्वरित मुख्य वीज प्रवाह (Main Switch) बंद करावा. त्यानंतर कोरड्या लाकडी काठीच्या किंवा प्लॅस्टिकच्या साहाय्याने त्या व्यक्तीला विजेच्या स्रोतापासून दूर करावे आणि त्वरित वैद्यकीय मदत मिळवून द्यावी.
📞 महावितरणचे आपत्कालीन संपर्क क्रमांक:
विद्युत सुरक्षेबाबत कोणतीही शंका असल्यास किंवा अपघात घडल्यास नागरिक महावितरणच्या 1912, 19120, 1800 212 3435 किंवा 1800 233 3435 या २४ तास सुरू असलेल्या टोल-फ्री क्रमांकांवर संपर्क साधू शकतात.
“घरातील विद्युत उपकरणांची वेळोवेळी तांत्रिक तपासणी करा, सतर्क राहा आणि सुरक्षित उन्हाळ्याचा आनंद घ्या,” असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.