चंद्रपूर: Ashish Randive Chandrapur Shivsena पक्षप्रवेशावरून आता चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडलेला हा प्रवेश आता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अवघ्या काही महिन्यांपूर्वी मशाल चिन्हावर निवडणूक लढलेले आशिष रणदिवे हे भाजपचे पदाधिकारी कसे बनले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेमुळे मुंबईतील वरिष्ठ नेतृत्वाची फसवणूक झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. (हे हि वाचा – ब्रह्मपुरीत सोलर अर्थिंग रॉड ची चोरी)
मुंबईत मातोश्रीवर किंवा पक्षाच्या मुख्य कार्यालयात पार पडणाऱ्या पक्षप्रवेशांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर मोठे राजकीय बळ मिळत असल्याचा दावा केला जात असला, तरी चंद्रपूर जिल्ह्यात मात्र एका पक्षप्रवेशामुळे गंभीर राजकीय प्रश्न निर्माण झाले आहेत. आशिष संजय रणदिवे यांनी मुंबई येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षाचे उपरणे बांधले. या प्रवेशाची छायाचित्रे आणि बातम्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाल्या. मात्र, या प्रवेशावेळी रणदिवे यांचा उल्लेख ‘भाजप पदाधिकारी’ असा करण्यात आल्याने स्थानिक राजकीय वर्तुळात भलतीच चर्चा रंगली आहे.
मशाल चिन्हावर निवडणूक अन् मग भाजप पदाधिकारी म्हणून प्रवेश?
स्थानिक पातळीवरून मिळालेल्या माहितीनुसार, आशिष रणदिवे हे काही नवीन नाव नाही. ते यापूर्वीपासूनच शिवसेनेच्या ठाकरे गटाशी संबंधित होते आणि त्यांनी डिसेंबर २०२५ मध्ये पार पडलेल्या स्थानिक निवडणुकीत शिवसेनेच्या अधिकृत ‘मशाल’ चिन्हावर निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना अवघी ८९ मते मिळाली होती. जर एखादी व्यक्ती काही महिन्यांपूर्वीच शिवसेनेच्या अधिकृत चिन्हावर निवडणूक लढवत असेल, तर आता थेट मुंबईत जाऊन त्यांचा ‘भाजपचा मोठा पदाधिकारी’ म्हणून पुन्हा पक्षात प्रवेश कसा घडवून आणला गेला, असा थेट प्रश्न उपस्थित होत आहे. ते भाजपमध्ये नेमके कधी गेले होते? आणि जर ते भाजपमध्ये होते, तर शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक कशी लढवली? या विसंगतीमुळे राजकीय वर्तुळात मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पत्रकारांच्या थेट प्रश्नावर आशिष रणदिवेंनी कट केला फोन
या संपूर्ण प्रकरणामागील सत्यता जाणून घेण्यासाठी पत्रकारांनी आशिष रणदिवे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांना “तुम्ही भाजपमध्ये कधी गेला होता आणि मशाल चिन्हावर कधी निवडणूक लढवली?” असा थेट प्रश्न विचारला असता, त्यांनी कुठलेही स्पष्ट उत्तर न देता थेट फोन कट केला. रणदिवे यांच्या या भूमिकेने त्यांच्या राजकीय प्रवासाबाबतच्या शंकांना अधिकच खतपाणी घातले आहे.
या घटनेमुळे आता चंद्रपूरमधील पक्षाचे स्थानिक पदाधिकारी मुंबईतील वरिष्ठ नेतृत्वाला आणि उद्धव ठाकरेंना अंधारात ठेवून चुकीची माहिती पुरवत आहेत का, असा सवाल निष्ठावंत शिवसैनिकांमधून विचारला जात आहे. स्थानिक पातळीवर राजकीय वजन दाखवण्यासाठी किंवा वरिष्ठांची वाहवा मिळवण्यासाठी भाजपच्या नावाचा वापर करून ठाकरे गटातीलच कार्यकर्त्यांचा पुनर्रप्रवेश दाखवला जात असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
केवळ आशिष रणदिवेच नव्हे, तर त्यांच्यासोबत सुमारे १५ ते २० कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे या सर्वच व्यक्तींच्या राजकीय पार्श्वभूमीची, आधीच्या पक्षीय संबंधांची आणि त्यांनी दिलेल्या राजीनाम्यांची सखोल पडताळणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. हे कार्यकर्ते खरोखरच भाजपचे होते की केवळ संख्याबळ दाखवण्यासाठी गोळा केलेले जुनेच कार्यकर्ते होते, याची तपासणी होणे आवश्यक मानले जात आहे.
चंद्रपूरमधील या कथित राजकीय ड्रामाची शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाने तातडीने गंभीर दखल घ्यावी आणि चंद्रपूरमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या या कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकारावर आशिष रणदिवे अथवा चंद्रपूरमधील ठाकरे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नाही.
आता मूळ प्रश्न हाच उरतो की, आशिष रणदिवे हे खरोखरच भाजपमधून शिवसेनेत आले आहेत की ते आधीपासूनच शिवसैनिक होते? आणि जर ते आधीपासूनच ठाकरे गटात होते, तर मुंबईतील पक्षश्रेष्ठींसमोर त्यांची ओळख भाजप पदाधिकारी म्हणून करून देण्यामागे कोणाचा स्वार्थ होता? या प्रश्नांची उत्तरे आता वरिष्ठ नेतृत्वाला शोधावी लागणार आहेत.
राजकीय खेळखंडोबा थांबणार कधी?
उबाठा पक्षाकडून नगरं परिषदेची निवडणूक लढली आणि निवडणूक नंतर भाजपचा पदाधिकारी म्हणून पक्षप्रवेश म्हणजे थेट पक्ष प्रमुखाची हि एक प्रकारे फसवणूक केली असल्याचे हे प्रकरण आहे, चंद्रपूर मनपात सुद्धा तीच परिस्थिती आहे, शिवसेना उबाठा पक्षाने सत्तेसाठी भाजपसोबत जाणे पसंत केले होते, त्यावेळी पक्षाचे खासदार संजय राऊत व अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया या युतीविरोधात होती तर शिवसेना उपनेत्या अंधारे यांची प्रतिक्रिया समर्थनार्थ होती, त्यामुळे एकीकडे भाजपला विरोध करायचा तर दुसरीकडे सत्तेत बसायचं हि राजकीय खेळी आता मतदारांच्या नजरेस आली आहे. त्यामुळे शिवसेना पक्षात सध्या खेळखंडोबा सुरु असल्याचे चित्र आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






