Solar Panel Earthing Rod Theft in Brahmapuri Solar Shop

ब्रह्मपुरीत दुकानातून ८४ सोलर अर्थिंग रॉडची चोरी

User avatar placeholder
Written by Prakash Hande

August 8, 2026

ब्रह्मपुरी: Solar Panel Earthing Rod ची चोरी झाल्याची खळबळजनक घटना ब्रह्मपुरी शहरात घडली आहे. गणवीर हॉस्पिटल रोडवरील एका सोलर दुकानाचे शटर उचकटून चोरट्याने हजारो रुपयांचा माल लांबवला. या घटनेमुळे स्थानिक व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. (हे हि वाचा – एकाच क्रमांकाचे २ ट्र्क, लाखोंचा मुद्देमाल जप्त)

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव (माहुरकुडा) येथील रहिवासी प्रशांत शालिकराम पुसतोडे (वय ३१) यांचे ब्रह्मपुरी येथे गणवीर हॉस्पिटल जवळ ‘राम इलेक्ट्रिक अँड सोलर पॅनेल’ नावाचे दुकान आहे. या दुकानात जुगनाळा येथील रहिवासी नागेश देवहरी हा तरुण काम करतो व दुकानाची दैनंदिन देखभाल व व्यवहार सांभाळतो. दररोजप्रमाणे ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता नागेश याने दुकान सुरळीत बंद केले आणि तो घरी निघून गेला.

दरम्यान, ६ ऑगस्टच्या सकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास स्थानिक नागरिक दीपक देंगे यांनी दुकानाचे शटर उघडे दिसल्याने आणि आतील सामान बाहेर अस्ताव्यस्त पडल्याचे पाहून तात्काळ दुकानमालक प्रशांत पुसतोडे यांना फोनवरून माहिती दिली. माहिती मिळताच प्रशांत यांनी सकाळी ८ वाजेच्या सुमारास दुकानात धाव घेतली. घटनास्थळी पाहणी केली असता दुकानाचे शटर जबरदस्तीने उचकटलेले आढळले आणि बाहेर एक लोखंडी सब्बल पडलेली दिसली. दुकानातील सामानाची पाहणी व बिलांची शहानिशा केल्यानंतर, प्रत्येकी २६० रुपये किमतीचे १ मीटर लांबीचे सोलर पॅनेलचे लोखंड व तांबे मिश्रित धातूचे एकूण ८४ नग अर्थिंग रॉड (एकूण किंमत २१,८४० रुपये) अज्ञात चोरट्याने लांबवल्याचे स्पष्ट झाले.

या चोरीप्रकरणी दुकानमालक प्रशांत पुसतोडे यांच्या तोंडी रिपोर्टवरून ब्रह्मपुरी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३०५(a) आणि ३३१(४) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, दुकानात बसवलेल्या सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांमधील फुटेजची पाहणी सुरू केली आहे. पोलीस निरीक्षक प्रमोद बनबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मुकेश गजाबे या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment