Maharashtra Smart Meter वादावर महावितरणची ४८ तासांची नोटीस

महावितरणची ४८ तासांची नोटीस; स्मार्ट मीटरवरून महाराष्ट्रात संतापाची लाट

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 13, 2026

मुंबई/नागपूर: Maharashtra Smart Meter मोहिमेअंतर्गत महावितरणकडून ग्राहकांना व्हॉट्सॲपवर ४८ तासांची पूर्वसूचना पाठवण्यात येत असल्याने राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे. स्मार्ट मीटर बसविण्याबाबत सक्ती केली जात नसल्याचे आश्वासन पूर्वी देण्यात आले होते. मात्र आता थेट मीटर बदलण्याची नोटीस मिळाल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम आणि संतापाचे वातावरण आहे. अनेक भागांत वीज खंडित होणे, लोडशेडिंग आणि स्मार्ट मीटरविरोधातील आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा अधिकच चर्चेत आला आहे.

राज्यात एकीकडे तीव्र उन्हाळ्यामुळे विजेची मागणी आणि वापर सातत्याने वाढत असतानाच, दुसरीकडे ग्रामीण व निमशहरी भागांत लोडशेडिंग आणि वारंवार वीज खंडित होण्याच्या प्रकारांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक भागांमध्ये संतप्त ग्राहकांनी महावितरणच्या कार्यालयांवर मोर्चे काढत आंदोलनेही केली आहेत. विजेच्या कल्पक नियोजनात आणि सुलभ सेवेच्या नावाखाली महावितरणचा पुरता बोजवारा उडालेला असतानाच, आता महावितरणने थेट ग्राहकांच्या व्हॉट्सॲपवर ‘अल्टिमेटम’ देणारे मेसेज पाठवण्यास सुरुवात केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. (लोक वर्गणीतून सायकली घेतल्या, सायकलीवर चोरांचा डल्ला)

मिळालेल्या माहितीनुसार, ग्राहकांना थेट ४८ तासांची पूर्वसूचना देऊन त्यांचे जुने मीटर बदलून ‘स्मार्ट मीटर’ बसवण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली आहे. यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र संताप आणि संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाला हरताळ?

काही महिन्यांपूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आणि जाहीर सभांमध्ये ‘राज्यात कुठेही बळजबरीने किंवा सक्तीने स्मार्ट मीटर बसवले जाणार नाहीत’ असे स्पष्ट आश्वासन दिले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतरही महावितरणच्या वतीने थेट ४८ तासांत मीटर बदलण्याचा संदेश (मेसेज) पाठवला जात असल्याने, प्रशासनाने शासनप्रमुखांच्या आश्वासनालाच केराची टोपली दाखवली आहे का, असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.

Maharashtra Smart Meter वाद नेमका काय आहे?

महावितरण कडून ग्राहकांच्या मोबाईलवर अधिकृतपणे पाठवल्या जाणाऱ्या मेसेजचा मजकूर खालीलप्रमाणे आहे:

“प्रिय उपभोक्ता,

भारत सरकारने दि. १७.०८.२०२१ रोजी जारी केलेल्या राजपत्र अधिसूचनेनुसार, जर तुमचे मीटर ‘स्मार्ट मीटर’ नसेल, तर हा संदेश मिळाल्यापासून ४८ तासांनंतर MSEDCL (महावितरण) किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींद्वारे तुमचे सध्याचे मीटर बदलून त्याऐवजी ‘स्मार्ट मीटर’ बसविण्यात येणार आहे. कृपया नोंद घ्यावी की, हा संदेश तुमचे सध्याचे मीटर बदलण्याबाबतची पूर्वसूचना आहे.”

महावितरणने सांगितलेले स्मार्ट मीटरचे फायदे:

१) अचूक बिलिंग: मानवी हस्तक्षेपाशिवाय (ह्युमन एरर) थेट रीडींग होणार असल्याने बिलात चुका होणार नाहीत.

२) वापरावर नियंत्रण: मोबाईल ॲपद्वारे ग्राहक आपल्या दैनंदिन वीज वापराचे लाइव्ह मॉनिटरिंग करू शकतील.

३) ८५ पैशांची सवलत: घरगुती ग्राहकांना सौरऊर्जा उपलब्ध असलेल्या वेळेत (Solar Hours) प्रति युनिट ८५ पैशांची विशेष सवलत मिळेल.

४) मोफत प्रक्रिया: सध्या ही मीटर बदलण्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे मोफत केली जात आहे.

छुपे शुल्क आणि सक्तीमुळे ग्राहकांमध्ये संशय

महावितरणने जरी सध्या ही सेवा मोफत असल्याचे म्हटले असले, तरी भविष्यात या स्मार्ट मीटरसाठी काही अतिरिक्त मासिक भाडे किंवा छुपे शुल्क आकारले जाणार का? याबद्दल मेसेजमध्ये किंवा प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत स्पष्टता देण्यात आलेली नाही.

तसेच, जुन्या पद्धतीत वीज बिल न भरल्यास महावितरणचे कर्मचारी घरी येऊन मीटर काढून नेण्याची कारवाई करत असत. मात्र, आता स्मार्ट मीटरमुळे कर्मचाऱ्यांना येण्याची गरज पडणार नाही; नियंत्रण कक्षातूनच थेट वीज पुरवठा खंडित (डिस्कनेक्ट) केला जाईल. बिल भरल्यानंतरच तो पूर्ववत केला जाईल. या डिजिटल कारवाईमुळे सर्वसामान्यांची अडवणूक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आंदोलनाचे सावट आणि रोष

एकीकडे वीज पुरवठ्यातील अनियमिततेमुळे जनता रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना, महावितरणने मूलभूत सुधारणा करण्याऐवजी ग्राहकांना थेट ४८ तासांचे अल्टिमेटम देणे म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. ग्राहकांचा विरोध डावलून जर सक्तीने ही मोहीम राबवण्याचा प्रयत्न झाला, तर संपूर्ण महाराष्ट्रात महावितरण विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment