भद्रावती - भावाच्या मुलाचा वाढदिवस कार्यक्रमासाठी नागपूरला गेले आणि घरी चोरी झाली, याप्रकरणी एकूण १ लाख २७ रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोराने लंपास केल्याची घटना ४ मे रोजी उघडकीस आली. भद्रावती पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (पत्नीने दिली पतीच्या हत्येची सुपारी)
भद्रावती शहरातील पाटील नगरात राहणारे ४० वर्षीय रोहित भाऊराव नगराळे हे २४ एप्रिल रोजी नागपुरात कुटुंबासोबत भावाच्या मुलाचा वाढदिवस कार्यक्रम असल्याने गेले होते. ४ मे रोजी शेजाऱ्याने रोहित नगराळे ला कॉल करीत तुमच्या घराचे दार उघडे आहे असे सांगितले. रोहित नगराळे हे तात्काळ भद्रावती मध्ये दाखल झाले.
घराच्या बाहेरील लॉक तुटलेल्या अवस्थेत होते, घराच्या आत बघितले असता सामान पूर्णतः अस्तव्यस्त होते, अलमारीचा लॉक तुटलेल्या अवस्थेत होता, लॉकर मधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून तब्बल १ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता.
अज्ञात चोरट्याने घरी प्रवेश करीत चोरी केल्याची तक्रार रोहित नगराळे यांनी भद्रावती पोलीस ठाण्यात दिली, पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला आहे. बाहेरगावी जात असताना याबाबत पोलिसांना माहिती द्यावी. असे असताना सुद्धा नागरिक निष्काळजीपणा करताना दिसत आहे.
Leave a Comment