विसापूर हळहळले: १०वीत ५६% मिळवलेल्या आयुषचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

May 10, 2026 by Prakash Hande

बल्लारपूर - बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील एका होतकरू विद्यार्थ्याचा विजेचा धक्का लागल्याने अत्यंत दुर्दैवी अंत झाला. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत आयुष विशाल लाडे या १६ वर्षीय मुलाने नुकत्याच लागलेल्या दहावीच्या परीक्षेत ५६ टक्के गुण मिळवून यशाचे शिखर गाठले होते. त्याचे बालपण संघर्षात गेले; वडिलांचे छत्र हरवल्यानंतर आईने दुसरा विवाह केला, त्यामुळे तो विसापूर येथे आपल्या आजोबांकडे राहून शिक्षण पूर्ण करत होता. शिक्षणाची जिद्द इतकी होती की, सुट्ट्यांच्या दिवसातही तो मिळेल ते काम करून स्वतःचा खर्च उचलत असे. (चंद्रपुरात ११ किलो गांजा जप्त)

 

रविवारी सकाळी ही काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. नेहमीप्रमाणे कामावर जाण्याच्या तयारीत असलेल्या आयुषने सकाळी आंघोळ केली आणि ओले कपडे वाळत घालण्यासाठी तो घराबाहेरील तारेकडे गेला. मात्र, त्या तारेत विद्युत प्रवाह उतरला असल्याचे त्याच्या लक्षात आले नाही. कपडे तारेवर टाकताच त्याला विजेचा जबरदस्त धक्का बसला, ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.

 

आयुष हा त्याच्या आजोबांचा मोठा आधार होता आणि आपल्या कष्टाने भविष्यात काहीतरी करून दाखवण्याचे स्वप्न तो पाहत होता. मात्र, एका छोट्याशा अपघाताने या कोवळ्या जिवाचा आणि त्याच्या स्वप्नांचा अंत झाला. या घटनेमुळे संपूर्ण विसापूर गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

+