चंद्रपुरात एकाच दिवशी २ भीषण अपघात: chandrapur fatal accident मध्ये ४ जणांचा मृत्यू

May 03, 2026 by Prakash Hande

चंद्रपूर: जिल्ह्यामध्ये आज अपघाताची भीषण मालिका पाहायला मिळाली. दोन वेगवेगळ्या महामार्गांवर झालेल्या भीषण अपघातांमध्ये ४ जणांना आपले प्राण गमवावे लागले असून ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. पहिली घटना तळोधी-नागभीड महामार्गावरील सोनेवाट तळोधी येथे सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. तळोधीहून सोनेवाट मार्गे मुख्य रस्त्यावर एका दुचाकीवरून जगदीश नामदेव नेवारे (२६, रा. मुरपार), शारदा यादव दुधकुरे (१९, रा. तळोधी) आणि पियुष कोहळे हे तिघे जण ट्रिपल सीट जात असताना, समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या साकेत ट्रॅव्हल्सने (MH 15 AK 1704) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. (झोपडीला कार धडकली, भिंत पडून मजुराचा मृत्यू)

 

ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील तिघेही ट्रॅव्हल्सच्या पुढील भागात घुसले आणि दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात जगदीश नेवारे आणि शारदा दुधकुरे यांचा जागीच मृत्यू झाला, तर पियुष कोहळे हा गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. ठाणेदार राहुल गुहे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय लांबट व मानकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

 

दुसरी घटना वरोरा-चंद्रपूर महामार्गावर नंदोरी गावाजवळ घडली. भद्रावती येथील एक लग्न समारंभ आटोपून एमएच ३२ बीआर ७३८६ क्रमांकाच्या दुचाकीने खानगाव मोझरी (ता. हिंगणघाट) कडे परतणाऱ्या चंद्रशेखर वालदे (२९) आणि मयूर हाडके (३३) यांना वरोराहून चंद्रपूरच्या दिशेने जाणाऱ्या एका मालवाहू वाहनाने (MH 34 BG 0156) समोरासमोर जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत दोन्ही दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. तसेच मालवाहू वाहनातील अक्षय थेरे (३०) आणि रघुनाथ डाखोरे हे दोघे जखमी झाले असून त्यांना वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

 

या घटनेमुळे नंदोरी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांनी तातडीने धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि वाहतूक सुरळीत केली. एकाच दिवशी झालेल्या या दोन मोठ्या अपघातांमुळे जिल्ह्यात मोठी हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या कुटुंबांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

Leave a Comment

+