चंद्रपूर - चंद्रपूर शहरानजीकच्या पद्मापूर येथील 'नवी किरण व्यसनमुक्ती केंद्रात' एका ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज, सोमवार १८ मे रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. (नेता व महिलेच्या त्रासाला कंटाळून कुल्फी व्यावसायिकाने केली आत्महत्या)
शुभम संजय टिपले (वय ३२ वर्षे, रा. समाधी वॉर्ड, चंद्रपूर) असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव असून, त्याच्या मृत्यूमुळे व्यसनमुक्ती केंद्राच्या संपूर्ण कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याप्रकरणी मृत शुभमच्या कुटुंबीयांनी दुर्गापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्राप्त माहितीनुसार, शुभम याला दारू किंवा इतर अंमली पदार्थांचे व्यसन असल्याने, त्या व्यसनातून त्याची सुटका व्हावी आणि त्याचे आयुष्य सुधारावे या उद्देशाने कुटुंबीयांनी त्याला अवघ्या दोन दिवसांपूर्वी, म्हणजेच १६ मे रोजी या व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले होते.
नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, केंद्रात भरती करताना शुभमची प्रकृती अगदी व्यवस्थित आणि सामान्य होती. मात्र, आज अचानक सकाळी केंद्र प्रशासनाकडून शुभमचा मृत्यू झाल्याचा फोन आल्याने टिपले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. सकाळी शुभमच्या शरीरात कोणतीही हालचाल न दिसल्याने केंद्र चालकांनी त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले, परंतु तेथील डॉक्टरांनी तपासणी अंती त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच दुर्गापूर पोलिसांनी रुग्णालयात धाव घेऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असून अकस्मात मृत्यूची नोंद करत पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, या व्यसनमुक्ती केंद्रात यापूर्वीही अनेक संशयास्पद मृत्यू झाले असून, काही जण येथून पळून गेल्याच्या घटना घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. आपले हक्काचे माणूस व्यसनातून बाहेर पडावे म्हणून हजारो रुपये खर्च करून कुटुंबीय अशा केंद्रात विश्वासाने पाठवतात, मात्र तिथेच जर त्यांच्या जीवाची सुरक्षा नसेल तर हा अतिशय गंभीर प्रकार आहे, असे म्हणत नागरिकांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दुसरीकडे, नवी किरण व्यसनमुक्ती केंद्राचे व्यवस्थापक दिगंबर गेडाम यांनी सांगितले की, शुभम तीन दिवसांपूर्वी दाखल झाला होता आणि त्याची तब्येत ठीक होती. आज सकाळी चहा-नाश्त्यासाठी सर्वजण उठले असता शुभम उठला नाही, त्यामुळे त्याच्या प्रकृतीची खात्री करण्यासाठी आम्ही त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवून कुटुंबीयांना माहिती दिली होती. मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलीस आता शवविच्छेदन अहवालाच्या आधारे मृत्यूचे नेमके कारण शोधत आहेत.
Leave a Comment