Chandrapur POCSO Case : नागभीड (चंद्रपूर) - चंद्रपूर: राज्यात महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने धक्कादायक वाढ होत असून, गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बदलापूर आणि नरसापूर येथील अमानुष घटनांच्या जखमा अद्याप ताज्या असतानाच, आता चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. तालुक्यातील मौजा बोंड या गावात एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील तरुणाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून नागभीड पोलिसांनी त्वरित कारवाई करत नराधम आरोपीला अटक केली आहे. (चंद्रपुरात रिलॅक्स हॉटेलमध्ये देहव्यापार)
मिळालेल्या माहितीनुसार, ही संतापजनक घटना घडल्यानंतर १८ मे रोजी पीडित मुलीच्या पालकांनी नागभीड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. नात्यातीलच असलेला १८ वर्षीय आरोपी संचित प्रवीण बगडे याने या निरागस मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून आपल्या घरी नेले. घरात कुणी नसण्याचा गैरफायदा घेत आरोपी संचित याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. हा क्रूर प्रकार घडल्यानंतर घाबरलेल्या मुलीने घरी परतल्यावर आपल्या पालकांना घडलेला सर्व आपबिती सांगितली. मुलीच्या तोंडून हा धक्कादायक प्रकार ऐकताच पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता नागभीड पोलीस स्टेशन गाठून आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली.
नागभीड पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने पावले उचलली आणि आरोपी संचित बगडे याला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ६४ (२) (i), ६५ (२) आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा म्हणजेच पॉक्सो (POCSO) च्या कलम ४ व ६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अटकेनंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले आहे. ही धडक कारवाई ब्रह्मपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनात आणि नागभीडचे पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पोटभरे यांनी केली असून पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत. अशा घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण असून गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे.
Leave a Comment