बल्लारपूर - स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरच्या पथकाने गुरुवारी, १४ मे २०२६ रोजी बल्लारपूर परिसरात अवैध रेती तस्करीविरुद्ध मोठी कारवाई केली असून यामध्ये दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्धा नदीच्या पात्रातून गौण खनिजाचे बेकायदेशीर उत्खनन करून त्याची चोरटी वाहतूक केली जात असल्याची विश्वसनीय माहिती पोलिसांना एका गुप्त खबऱ्याकडून मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बल्लारपूर येथे छापा टाकला असता, विना क्रमांकाच्या ट्रॉलीसह रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पथकाच्या जाळ्यात अडकला. (ब्रह्मपुरीत १० पेट्या दारू जप्त)
या कारवाई दरम्यान पोलिसांनी ५ लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर (क्रमांक MH34BV 2632) आणि १० हजार रुपये किमतीची एक ब्रास रेती असा एकूण ५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी विनोद विठ्ठल आत्राम या आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पुनमचंद बहुरिया हा दुसरा आरोपी सध्या फरार आहे. या दोन्ही आरोपींविरुद्ध बल्लारपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२), ४९ सह जमीन महसूल कायद्याच्या कलम ४८(७), ४८(८) आणि मोटर वाहन कायद्याच्या कलम १७७ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय सर्वेश बेलसरे आणि ब्रह्मपुरी उपविभागाच्या पथकाने ही धाडसी कारवाई यशस्वीपणे पार पाडली. नदी पात्रातून होणारी पर्यावरणाची हानी आणि शासकीय महसुलाची चोरी रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने उचललेल्या या पावलामुळे रेती माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस सध्या फरार आरोपीचा शोध घेत असून या तस्करीमध्ये आणखी कोणाचे हात गुंतले आहेत, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
Leave a Comment