Tiger Attack Chandrapur : नागभीड : चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात २५ मार्चला सकाळच्या सुमारास जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला चढवीत ठार केले. मानव-वन्यजीव संघर्षात जिल्ह्यातील बळीची संख्या १० पोहोचली आहे. (बैलाला वाचविण्यासाठी गेला आणि स्वतः शिकार झाला)
ब्रह्मपुरी वन विभागांतर्गत तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्रातील तळोधी बीटमध्ये सावरला गावाजवळ कक्ष क्रमांक ८९ परिसरातील झुडपी जंगलात ही घटना घडली. तळोधी येथील प्रेमिला वाटघुरे (वय ४५) या महिला घरात स्वयंपाकासाठी सरपण (लाकूड) आणण्यासाठी जंगलात गेल्या असताना वाघाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा बळी घेतला.
तळोधी परिसरात घरगुती गॅसची तीव्र टंचाई असल्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना स्वयंपाकासाठी जंगलातून लाकूड आणावे लागते. यामुळे त्यांना दररोज जीव धोक्यात घालून जंगलात जावे लागत आहे. आज सकाळीही काही महिला सरपण गोळा करण्यासाठी जंगलात गेल्या होत्या. सरपण गोळा करीत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने प्रेमीला वर हल्ला केला, इतर महिलांसमोर वाघाने प्रेमीला याना तब्बल १०५ मित्र अंतरावरील झुडुपात फरफटत नेले, महिलांनी आरडाओरडा केला असता वाघ जंगलाच्या दिशेने पळाला मात्र प्रेमीला चा जीव वाचू शकला नाही.
महिलांनी याबाबत गावकऱ्यांना व वन विभागाला माहिती दिली. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी अरूप कन्नामवार यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र सहाय्यक अरविंद माने, वनरक्षक राजेंद्र भरने, वनरक्षक बांगर मॅडम तसेच मगोवा पथकाची टीम आणि स्वाब संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर व सदस्य घटनास्थळी दाखल झाले.
तळोधी पोलिस ठाण्याचे ठाणेदार राहुल गुहे यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी नागभीड ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. वनविभागाने मृतक महिलेच्या कुटुंबाला यावेळी आर्थिक मदत दिली. दरम्यान, घटनास्थळी वन विभागाने १० ट्रॅप कॅमेरे व २ लाईव्ह कॅमेरे बसवले असून वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.
Leave a Comment